राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या ठाण्याच्या दोन पोलिसांचा गौरव

ममता डिसोझा व महादेव काळे यांचा पोलीस आयुक्तांकडून सत्कार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जानेवारी २०२५
ठाणे, – राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या ठाणे पोलीस दलातील दोन पोलिसांचा पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून गौरव करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमांत पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त ममता डिसोझा आणि पोलीस उपनिरीक्षक महादेव काळे यांचा सत्कार केला. ७६ व्या प्रजाकसत्ताक दिनी ठाण्यातील दोन पोलीस अधिकार्‍यांना गुणवत्तापूर्वक सेवेबाबत राष्ट्रपदी पदक जाहीर झाले होते. त्यात विशेष शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त ममता डिसोझा आणि विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गोविंद काळे यांचा समावेश होता. या दोघांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

सहाय्यक पोलीस आयुक्त ममता डिसोझा यांची पोलीस दलात ३४ वर्ष सेवा झाली असून त्या १९९० साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांच्या सेवेच्या संपूर्ण कालावधीत त्यांना २९५ बक्षिसे, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले होते. त्यांना पोलीस महासंचालक यांच्या सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले होते. कामोठे पोलीस ठाण्यात कार्यरत असताना दोन वर्ष नऊ महिन्यांच्या एका मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचाराचा त्यांनी उत्कृष्ठ तपास करुन भौतिक पुरावे गोहा करुन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. या गुन्ह्यांचा सर्वोत्कृष्ठ तपासासाठी त्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांकडून गौरविण्यात आले होते.

पोलीस उपनिरीक्षक महादेव काळे हे सध्या ठाण्यातील विशेष शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या ३७ वर्षांच्या पोलीस सेवेत त्यांना १९० बक्षिसे, प्रशस्तीपत्रकासह पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने गौरविण्यात आले आहे. २००० साली ठाण्यात असताना हिजबुल या दहशतवादी संघटनेचे चार अतिरेकी मुंब्रा परिसरात घातपात घडविण्यासाठी, घातक शस्त्रांसह लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या दशहतवाद्यांची माहिती काढून चारही दहशतवाद्यांना अटक करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

अशा या दोन्ही अधिकार्‍यांना यंदाच्या प्रजाकसत्ताक दिनी गुणवत्तापूर्वक सेवेबाबत राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी विशेष अभिनंदन केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page