मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 जानेवारी 2026
ठाणे, – आंधप्रदेशातून आणलेल्या गांजासह एका आरोपीस ठाण्यातील अॅण्टी नारकोटीक्स सेल आणि मालमत्ता कक्षेच्या अधिकार्यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अटक केली.चिन्ना टागुर लक्ष्मण नायक असे या 36 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा आंधप्रदेशच्या तेलंगणाचा रहिवाशी आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 कोटी 4 लाख 16 हजार रुपयांचा 638 किलो गांजा आणि दहा लाखांची एक इनोव्हा कार असा 2 कोटी 14 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चिन्नाविरुद्ध एनडपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने शनिवार 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सरत्या वर्षांला निरोप देताना तसेच नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणे पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. याच दरम्यान आंधप्रदेशातून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस हवालदार जयकर जाधव यांना मिळाली होती. ही माहिती त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगितला. त्याची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी गंभीर दखल घेत अॅण्टी नारकोटीक्स सेलसह मालमत्ता कक्षाला शहानिशा करुन संबंधित आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस हवालदार दिनेश कुंभारे, प्रशांत भुर्के, संदीप भांगरे, महेश साबळे, जयकर जाधव, राहुल शिरसाठ, पोलीस नाईक सचिन कोळी, तौसिक सय्यद, पोलीस अंमलदार महेश सावंत, सदन मुळे, महिला पोलीस हवालदार आशा गोळे, महिला पोलीस नाईक गिताली पाटील यांनी खारेगाव टोल नाक्याकडून कळवा बाजूकडे जाणार्या रोडवर साध्या वेशात पाळत ठेवली होती.
मंगळवारी सायंकाळी पोलिसांना एक इनोव्हा कार ठाण्याच्या दिशेने येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी कारचालकाला थांबविण्याचा प्रयत्न इशारा केला, मात्र त्याने त्याचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी या कारचालकाला काही अंतरापर्यंत पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याच्या कारची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्यांना 638 किलो गांजाचा साठा सापडला. त्याची किंमत दोन कोटी चार लाख सोळा हजार रुपये इतकी किंमत आहे. या गांजासह दहा लाखांची इनोव्हा कार असा मुद्देमाल ताब्यात घेतल्यानतर कारचालकाला पोलिसांनी युनिट कार्यालयात आणले.
चौकशीत कारचालकाचे नाव चिन्ना नायक असल्याचे उघडकीस आले. चिन्ना हा तेलंगणा, मेहबूबनगर, मरकेलचा रहिवाशी आहे. तो आंधप्रदेशातून ठाण्यात गांजा विक्रीसाठी घेऊन आला होता. मात्र या गांजाची डिलीव्हरी करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याला गांजा कोणी दिला, तो कोणाला देणार होता. त्याने यापूर्वीही गांजाची तस्करी केली आहे का, या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहे.