गर्दीचा फायदा घेऊन लोकलमध्ये चोरी करणार्या महिलेस अटक
सहा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करुन मुद्देमाल हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 ऑक्टोंबर 2025
ठाणे, – गर्दीचा फायदा घेऊन लोकलमधील महिलांचे सोनसाखळी चोरी करणार्या एका रेकॉर्डवरील महिलेस ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक केली. या महिलेच्या अटकेने ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यातील सहा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तिच्याकडून सहाही गुन्ह्यांतील पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
अनिता जिग्नेश सोलंकी ही महिला 23 सप्टेंबरला ठाणे रेल्वे स्थानकात आली होती. सायंकाळी पावणेसहा वाजता फलाट क्रमांक तीनवर लोकल पकडत असताना अचानक एका महिलेने तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार तिच्या लक्षात येताच तिने आरडाओरड करुन पळून जाणार्या महिलेला पकडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांनी पळून जाणार्या महिलेला शिताफीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिची पोलिसांनी चौकशी केली असता ती सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले.
तिच्या चौकशीतून ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सहा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या सहाही गुन्ह्यांतील 27 ग्रॅम वजनाचे सुमारे पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तिच्या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची माहिती पोलिसांना समजली असून या गुन्ह्यांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदराज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दसाने, पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद देशमुख, विजय गोपाळ, पोलीस हवालदार शैलेश सुतार, महिला पोलीस हवालदार गीता राऊळ, भारती फाळके, गायत्री माळी, पोलीस शिपाई विकास केदार, किशोर मुसळे, गोपाळ बैनाड, हनुमंत खांडेकर यांनी केली.