ठाण्यातील हायफाय स्पामध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
स्पाच्या मॅनेजरसह महिलेस अटक तर सात महिलांची सुटका
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ ऑक्टोंबर २०२४
ठाणे, – ठाण्यातील हाई स्ट्रिट मॉलमधील एवलॉन वेलनेस फॅमिली स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरु असलेल्या एका हायफाय सेक्स रॅकेटचा ठाणे खंडणीविरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत स्पाचा मॅनेजरसह महिलेस पोलिसांनी अटक केली. राहुल किसन गायकवाड आणि प्रिया ऊर्फ रुप भगवानदास दुडेजा अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भान्याससह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी सात महिलांची सुटका केली असून या महिलांना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविणयात आले आहे. या गुन्ह्यांत सुंधाशू कुमार सिंग आणि कविता पवार या स्पाच्या मालक आणि चालकाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ठाण्यातील कापूरबावडी जंक्शन, हाई स्ट्रिट मॉलमध्ये एवलॉन वेलनेस फॅमिली नावाचे एक स्पा सेंटर आहे. या स्पामध्ये मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांना मिळाली होती. या माहितीनंतर त्यांनी खंडणीविरोधी पथकाला शहानिशा करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने शहानिशा केली होती. यावेळी बोगस ग्राहकाने तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचा सिग्नल पोलिसांना दिला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे, शेखर बागडे, प्रभारी पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सुभाष तावडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबर, ढोकणे, भोसले, महिला पोलीस हवालदार पावसकर, परांजपे, पोलीस हवालदार कानडे, शिंपी, गुरसाळी, पोलीस शिपाई शेजवळ, महिला पोलीस शिपाई भोसले, करे, पोलीस नाईक चालक हिवरे यांनी मंगळवारी सायंकाळी चार वाजता तिथे छापा टाकला होता. यावेळी तिथे असलेल्या मॅनेजर राहुल गायकवाड आणि प्रिया दुडेजा या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
स्पामध्ये पोलिसांना सात महिला सापडल्या. त्यांच्या चौकशीतून तिथे मसाजच्या नावाने त्यांना ग्राहकांसोबत शारिरीक संबंधासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या सातही महिलांची सुटका करुन त्यांना मेडीकलसाठी पाठविण्यात आले. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते. याप्रकरणी स्पाच्या मालक, चालक, मॅनेजरसह इतरांविरुद्ध पोलिसांनी १४३ (१), (२), १४३ (३) भारतीय सहकलम ३, ४, ५ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले तर चालक आणि मालकाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले. यातील राहुल हा यवतमाळ तर प्रिया ही कल्याणची रहिवाशी आहे. अटकेनंतर या दोघांनाही बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.