न्यू इअर इव्हेंट कार्यक्रम आयोजित करुन द ललित हॉटेलची फसवणुक

१.३८ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ जानेवारी २०२५
मुंबई, – न्यू इअर इव्हेंट कार्यक्रम आयोजित करुन द ललित हॉटेल प्रशासनाची १ कोटी ३८ लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंश इंटरटेन्मेट कंपनीचे मालक आणि व्यावसायिक लाभांश उचाहरिया याच्याविरुद्ध सहार पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी व्यावसायिकाची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंधेरीतील सहार एअरपोर्ट रोडवर द ललित नावाचे एक हॉटेल असून या हॉटेलमध्ये दविंदर रघुबरदयाल बिसोया हे महाप्रबंधक म्हणून काम करतात. दविंदर हे मूळचे दिल्लीचे रहिवाशी असून गेल्या वर्षांपासून ते हॉटेलमध्येच राहतात. त्यांच्यावर हॉटेलचे प्रशासकीय काम, मॅनेजमेंट, कामगार, फायानान्स आणि व्यवसाय आदी सर्व कामाची जबाबदारी आहे. हॉटेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात दरवर्षी ३१ डिसेंबरनिमित्त नवीन वर्षांच्या पार्टीच्या कार्यक्रमाचा समावेश होता. त्याचे आयोजन हॉटेल प्रशासनाकडून बाहेरील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिले जाते. ऑक्टोंबर २०२४ रोजी अंश इंटरटेन्मेट कंपनीचे मालक लाभांश उचाहरिया यांनी त्यांच्याकडे न्यू इअर पार्टीचे एक प्रपोजल ठेवले होते. त्यांच्या कंपनीकडून यापूर्वी होळी, पूल पार्टी, किटी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा विश्‍वास होता.

याबाबत सविस्तर चर्चेनंतर त्याच्या कंपनीला न्यू इअर पार्टीच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यात हॉटेलकडून त्यांच्या कंपनीला इव्हेंट करण्यासाठी जागा, जेवण, दारु, सिक्युरिटी, लायसन्स पुरविण्याची जबाबदारी होती. या कामासाठी अंश कंपनीला हॉटेल प्रशासनाला १ कोटी ७८ लाख ६९ हजार ६०० रुपये देण्याचे ठरले होते. त्यास लाभांश उचाहरिया यांनी मंजुरी दिल्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता. या करारानंतर लाभांशच्या कंपनीला आयोजनासाठी कलाकार, प्रोडेक्शन, तिकिट विक्रीची मंजुरी देण्यात आली होती. या व्यक्तिरिक्त पाचशे लोकांना निशुल्क प्रवेश देण्याचे ठरले होते. त्यात हॉटेल आणि अंश कंपनीकडून प्रत्येकी अडीचशे लोकांचा उपस्थित राहण्याची मंजुरी देण्यात आली होती. या इव्हेंटसाठी सुमारे साडेतीन हजार लोकांनी तिकिट खरेदी केली होती. त्यामुळे लाभांशने आगाऊ २९ लाखांची पेमेंट हॉटेलला दिले होते. मात्र इव्हेंटच्या दिवशी संपूर्ण पेमेंट देण्याचे आश्‍वासन देऊनही त्यांनी त्याच्या कंपनीने हॉटेलचे उर्वरित पेमेंट दिले नाही.

याबाबत कंपनीच्या वरिष्ट अधिकार्‍यांकडे सतत विचारणा होत होती. मात्र त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. प्रत्येक वेळेस ते वेळ मारुन नेत होते. त्यामुळे दविंदर बिसोया यांनी इव्हेंटचे काम थांबविले होते. ही माहिती मिळताच लाभांशने त्यांची भेट घेऊन रात्री उशिरा संपूर्ण पेमेंट देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी इव्हेंटला पुन्हा मंजुरी दिली होती. मात्र रात्री उशिरा त्याने पेमेंट केले नाही. तोपर्यंत हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. अचानक इव्हेंट थांबविला असता तिथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असता. त्यामुळे हॉटेलची बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी हस्तक्षेप घेतला नाही. रात्री लाभांशने आणखीन अकरा लाखांचे पेमेंट केले होते.

अशा प्रकारे १ कोटी ७८ लाख ६९ हजार रुपये देण्याचे ठरले असताना लाभांशच्या कंपनीने केवळ ४० लाखांचे पेमेंट केले होते. उर्वरित १ कोटी ३८ लाख १४ हजार ६०० रुपयांचे पेमेंट न करता द ललित प्रशासनाची फसवणुक केली होती. अंश इंटरटेन्मेंट कंपनीकडून पेमेंट येण्याची शक्यता नसल्याने अखेर दविंदर बिसोया यांनी हॉटेलच्या वतीने सहार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अंश इंटरटेन्मेट कंपनीचे मालक लाभांश उचाहरिया याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page