चोरीच्या गुन्ह्यांत डिजीटल मार्केटिंग कर्मचार्याला अटक
व्यावसायिकाच्या कार्यालयातून 25 लाखांची चोरी केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 नोव्हेंबर 2025
मुंबई, – चोरीच्या गुन्ह्यांत श्रीयांस मयुर दोशी नावाच्या एका 29 वर्षांच्या डिजीटल मार्केटिंग कर्मचार्याला चारकोप पोलिसांनी अटक केली. श्रीयांसवर कांदिवलीतील एका रियल इस्टेट व्यावसायिकाच्या कार्यालयातून 25 लाखांची कॅशसहीत सोन्याचे दागिने चोरी केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
57 वर्षांचे निमेश मुरलीधर शहा हे कांदिवलीतील डहाणूकरवाडी, महावीरनगरच्या वसंत आराधना टॉवर इमारतीमध्ये राहतात. त्यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय असून गेल्या तीस वर्षांपासून ते त्यांच्या घरातून हा व्यवसाय करत आहेत. त्यांची स्वतची अमिसुझी इस्टेट कन्स्ल्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. या कंपनीत श्रीयांस हा मार्च 2025 पासून डिजीटल मार्केटिंगचे काम करतो. प्रत्येक दलालीमधून त्याला तीस टक्के रक्कम कमिशन म्हणून दिली जात होती. एप्रिल 2025 रोजी त्यांच्या राहत्या घराचे नूतनीकरणाचे काम सुरु होते. त्यामुळे त्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि कॅश त्यांच्या कंपनीच्या कार्यालयातील ड्राव्हरमध्ये ठेवली होती.
17 ऑक्टोंबरला त्यांना एका व्यवहाराचे 42 हजार रुपये मिळाले होते, त्यापैकी पंधरा हजार रुपये त्यांनी त्यांच्या सीएला दिले तर 27 हजार रुपये त्यांच्या टेबलवर ठेवले होते. दोन दिवसांनी ते त्यांच्या कार्यालयात आले होते, यावेळी त्यांना तिथे सतरा हजाराची कॅश सापडली नाही. त्यांनी सर्वत्र पैशांचा शोध घेतला. मात्र त्यांना सतरा हजार रुपये सापडले नाही. याबाबत त्यांनी श्रीयांसला विचारणा केली होती. मात्र त्याने काही उत्तर दिले नाही. त्यानंतर तो कामावर येणे बंद झाला होता.
याबाबत विचारणा करुनही तो कामावर येण्यास टाळत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी कार्यालयातील ड्राव्हरमधील पाहणी केली होती. त्यात त्यांना त्यांच्या घरातून आणलेले सोन्याचे दागिने आणि 25 लाखांची कॅश असा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. या चोरीमागे श्रीयांस याचा सहभाग असल्याची शंका व्यक्त करुन निमेश शहा यांनी चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी श्रीयांस दोशीविरुद्घ चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच श्रीयांसला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्याला चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार आहे.