व्यावसायिकाच्या घरातील 49 लाखांच्या सोन्याचे बिस्कीट-कॉईनची चोरी
चोरीचा गुन्हा दाखल होताच आरोपी नोकरासह तिघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 जानेवारी 2026
मुंबई, – वांद्रे येथील एका व्यावसायिकाच्या घरातील एक हजार ग्रॅम वजनाच्या सुमारे 49 लाख रुपयांच्या प्रत्येकी शंभर ग्रॅम वजनाच्या सोन्याचे बिस्कीट आणि कॉईन चोरीचा पर्दाफाश करण्यात वांद्रे पोलिसांनी यश आले आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच घरातील नोकरासह तिघांना पोलिसांनी अटक केली. अरविंदकुमार भंवरलाल सोनकर, मनिष कालाजी कौशल आणि राजन लालजी कौशल अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना मे डिसेंबर 2025 या कालावधीत वांद्रे येथील 27 वा रोड, शरण अपार्टमेंटमध्ये घडली होती. याच अपार्टमेंटच्या रुम क्रमांक 201 मध्ये राघवेंद्र रमी नागपाल हे त्यांच्या पत्नीसोबत राहतात. राघवेंद्र हे व्यावसायिक असून त्यांची आकाश अॅण्ड राघवेंद्र नावाची एक खाजगी कंपनी आहे. त्यांचा एक कर्जत परिसरात फार्महाऊस असून तिथे त्यांची आई रामी नागपाल राहते. त्यांच्याकडे अरविंद सोनकर आणि बिपीनकुमार असे दोन नोकर आहेत. दिवसभर काम केल्यानंतर ते रात्रीच्या वेळेस त्यांच्याच रुममध्ये झोपत होते. सहा वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी स्काय लाक इमारतीमध्ये असलेला त्यांच्या मालकी हक्काचा फ्लॅटची विक्री केली होती. या फ्लॅटच्या विक्रीतून आलेल्या रक्कमेतून त्यांनी फेब्रुवारी 2025 रोजी 1006 ग्रॅम वजनाचे 49 लाख 71 हजार 665 रुपयांचे प्रत्येकी शंभर ग्रॅम वजनाचे आठ सोन्याचे बिस्कीट आणि दोन सोन्याचे कॉईन खरेदी केले होते. ते सोन्याचे बिस्कीट आणि कॉईन त्यांनी त्यांच्याकडे दिले होते.
2025 साली त्यांनी घरातील सर्व सामान नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट केले होते. यावेळी त्यांनी सोन्याचे दागिने, बिस्कीट आणि कॉईन एका पिशवीत पॅक करुन टिव्ही युनिटच्या ड्राव्हरमध्ये ठेवले होते. या ड्राव्हरला लॉक करायला ते विसरुन गेले होते. सामान शिफ्ट केल्यानंतर ते घरातील सर्व दागिने बँकेत लॉकर उघडून ठेवणार होते. त्यासाठी त्यांनी एका बॅकेत लॉकरसाठी अर्ज केला होता. जानेवारी 2026 रोजी बँकेकडून त्यांना लॉकर मिळणार होता. 17 डिसेंबरला त्यांनी त्यांनी त्यांच्या घरातील मौल्यवान सामानाची पाहणी केली होती. टिव्ही युनिटच्या ड्राव्हरमधील सोन्याचे बिस्कीट आणि कॉईनची पाहणी केल्यानंतर त्यात त्यांना बिस्कीट आणि कॉईन सापडले नाही.
49 लाख 71 हजार रुपयांचे आठ सोन्याचे बिस्कीट आणि दोन कॉईन गायब होते. याबाबत त्यांनी त्यांच्या पत्नीसह दोन्ही नोकराकडे विचारणा केली होती, मात्र त्यांना बिस्कीटसह कॉईनबाबत काहीच माहिती नव्हती. या प्रकारानंतर त्यांनी वांद्रे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घरातील नोकर अरविंदकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच मनिष कौशल आणि राजन कौशल यांच्या मदतीने या सोन्याच्या बिस्कीट आणि कॉईनची चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या तिघांनाही नंतर पोलिसांनी अटक करुन वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.