चोरीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या मिडीया मॅनेजरला अटक
मित्रासोबत साडेआठ लाखांचे दागिने चोरी केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
9 सप्टेंबर 2025
मुंबई, – अंधेरीतील एका व्यावसायिकाच्या खाजगी कंपनीत मिडीया मॅनेजर म्हणून कामाला असलेल्या वॉण्टेड आरोपीस डी. एन नगर पोलिसांनी अटक केली. टेरेन्स ज्युडे स्मिथ असे या आरोपी मॅनेजरचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यांत त्याचा मित्र निरपक मजिंदर सिंग हा सहआरोपी असून त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या दोघांनी त्यांच्याच व्यावसायिक मालकाच्या घरातून साडेआठ लाखांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचा आरोप आहे.
कपिलदेव ओमप्रकाश अग्रवाल हे मूळचे दिल्लीतील अलिगढचे रहिवाशी असून सध्या ते अंधेरीतील आंबोली, सिझर रोड, महालासा निवासच्या फ्लॅट क्रमांक पाचमध्ये राहतात. त्यांची स्वतची कपिल मिडीयाज प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी असून या कंपनीचे सर्व व्यवहार त्यांच्या राहत्या घरातून चालते. मे 2025 रोजी त्यांच्या कंपनीत साोशन मिडीया मॅनेजरची पोस्ट खाली होती. त्यासाठी त्यांनी गुगलवर जाहिरात दिली होती. या जाहिरातीनंतर टेरेन्स स्मिथ हा त्यांच्याकडे मुलाखतीसाठी आला होता. मुलाखतीनंतर तो जून महिन्यांत त्यांच्याकडे मिडीया मॅनेजर ट्रेनिंगच्या पदावर रुजू झाला होता. टेरेन्सकडे मुंबईत राहण्याची व्यवस्था नव्हती, त्यामुळे तो त्यांच्यासोबत त्यांच्या राहत्या घरी राहत होता.
7 जूनला त्यांच्या मुलगा आजारी असल्याने कपिलदेव हे त्यांच्या दिल्लीतील राहत्या घरी निघून गेले होते. यावेळी त्यांच्या घरी टेरेन्स हा एकटाच राहत होता. यावेळी त्याने त्याचा मित्र निपपक सिंग याला त्यांच्या घरी आणले होते. 25 जुलैला ते त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या कपाटातील सुमारे साडेआठ लाखांचे विविध सेान्याचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. यावेळी घरी टेरेन्स स्मिथ आणि त्याचा मित्र निरपक सिंग हे दोघेही नव्हते. त्यांनी त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मोबाईल बंद होता.
टेरेन्स आणि निरपक या दोघांनी मिळून त्यांच्या घरात चोरी करुन पलायन केल्याची खात्री होताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मच्छिंदर यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीची त्यांनी गंभीर दखल घेत दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाईचे आदेश दिले होते. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मच्छिंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे व अन्य पोलीस पथकाने पळून गेलेल्या टेरेन्स स्मिथला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत त्यानेच निरपक सिंगच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे काही दागिने जप्त केले असून उर्वरित दागिने लवकरच हस्तगत केले जाणार आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.