मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ जून २०२४
मुंबई, – चोरीच्या गुन्ह्यांतील दोन वॉण्टेड आरोपींना बोरिवली आणि एमएचबी पोलिसांनी अटक केली. प्रकाश दालचंद कोठारी आणि आशिष अर्जुन आंबेकर अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोन्ही नोकरांना पोलीस कोठडी सुनावली आहे. लवकरच या दोघांकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विकास हरकचंद जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते बोरिवली परिसरात राहतात. याच पसिरात त्यांचे कंचन गोल्ड ऍण्ड डायमंड ज्वेलरीचे एक दुकान आहे. तिथे प्रकाश हा गेल्या तीन महिन्यांपासून कामाला होता. ९ जूनला त्यांनी त्यांचा मुलगा हर्षितला दुकानातील दागिन्यांची तपासणी करण्यास सांगितले होते. तपासणीदरम्यान त्याला काही दागिने कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने पुन्हा दागिन्यांची तपासणी केली होती. यावेळी त्याला दुकानातील दोन सोन्याची चैन, एक मंगळसूत्र असा सुमारे सव्वाचार लाखांचे दागिने कमी असल्याचे दिसून आले. त्याच दिवशी प्रकाश हा काकाच्या अंत्यविधीसाठी जायचे आहे असे सांगून दुकानातून गेला होता. १० जूनला त्याने त्यांना एक मॅसेज केला होता. त्यात त्याने पैशांची गरज असल्याने मीच दुकानातील दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तीन ते चार दिवसांत दागिने परत करतो असे नमूद केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने दागिने परत केले नाही किंवा दागिन्यांचे पैसे दिले नाही. त्याला कॉल केल्यानंतर तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. या घटनेनंतर त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या प्रकाश कोठारी या ५५ वर्षांच्या आरोपी कर्मचार्याला मंगळवारी विरार येथून अटक केली.
दुसर्या चोरीच्या गुन्ह्यांत आशिष आंबेकर याला एमएचबी पोलिसांनी अटक केली. आशिष हा गेल्या दिड वर्षांपासून दहिसर येथील कुंदनसिंग बिंदाप्रसाद सिंग यांच्या फार्मा मशिनरी सेल्स ऍण्ड सर्व्हिस कंपनीत कामाला होता. १३ मेला आशिष हा दुकानात आला आणि त्याने कार्यालयातील लॅपटॉप आणि सोळा हजाराची कॅश असा चाळीस हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार कुंदनसिंग यांच्या लक्षात येताच त्यांनी आशिषविरुद्ध एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आशिषचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच मंगळवारी २५ जूनला आशिषला पोलिसांनी विरार येथून अटक केली. अटकेनंतर आशिष आणि प्रकाश या दोघांनाही बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांकडून लवकरच चोरीचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप आणि कॅश हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.