मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मे २०२४
मुंबई, – रविवारी दिवसभरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अतुल खरोसे, लवकुश ब्रिजलाल यादव आणि विरेंद्र सिंह यांचा समावेश आहे. याप्रकरणी पवई, विक्रोळी आणि खार पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. दोन आरोपी अपघातानंतर पळून गेले तर प्रमिला खुबचंदानी या महिलेस खार पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली.
पहिला अपघात रविवारी दुपारी साडेबारा वाजता विक्रोळी येथील ठाणे-मुंबई वाहिनी महामार्गावरील पंतनगर ब्रिजवर झाला. अरुण ब्रिजलाल यादव हे विक्रोळीतील नेताजी चाळीत राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. मृत लवकुश हा त्यांचा लहान भाऊ आहे. तो त्याच्या पत्नी आणि दिड वर्षांच्या मुलासोबत हरियाली व्हिलेज, कांबळे बाई चाळीत राहतो. तो महालक्ष्मी येथील एका खाजगी कंपनीत कामाला होता. रविवारी दुपारी साडेबारा वाजता लवकुश हा त्याच्या बाईकवरुन कामाला जाण्यासाठी निघाला होता. त्याची बाईक पंतनगर ब्रिजवर येताच भरवेगात जाणार्या एका टेम्पोची धडक लागली होती. त्यात लवकुशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अपघातानंतर तो पळून गेला आहे. त्यामुळे त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
दुसरा अपघात रविवारी सायंकाळी सात वाजता पवई-प्लाझा सिग्नल, जेव्हीएलआरकडे जाणार्या वाहिनीवर झाला. अलका खरोसे ही महिला तिचा पती अतुलसोबत कांजूरमार्ग येथे राहते. अतुल हे पवईतील एल ऍण्ड टी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. रविवारी त्यांची सुट्टी होती, मात्र रविवारी कर्मचारी कमी असल्याने त्यांना कामावर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे ते सायंकाळी सहा वाजता कामासाठी त्यांच्या स्कूटीवरुन निघाले होते. पवई प्लाझा सिग्नलजवळ येताच त्यांच्या स्कूटीला एका डंपरने धडक दिली होती. त्यात अतुल हे गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पवई पोलिसांन घटनास्थळी धाव घेऊन जखमी अतुलला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर डंपरचालक पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध पवई पोलिसांनी हलगर्जीपणाने डंपर चालवून एका स्कूटीचालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तिसर्या अपघातात विरेंद्र सिंह या तरुणाचा मृत्यू झाला. अंधेरीतील कोलडोंगरी परिसरात विरेंद्र हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. रविवारी तो त्याच्या बाईकवरुन पिठाची डिलीव्हरीसाठी खार येथे गेला होता. ही बाईक खार येथील सतराव्या रस्त्यावर आली असता एका वाहनाने त्याच्या बाईकला धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या विरेंद्रला पोलिसांनी भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी खार पोलिसांनी प्रमिला खुबचंदानी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर तिची पोलिसांनी जामिनावर सुटका केली.