मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ जानेवारी २०२५
मुंबई, -अपघाताच्या दोन घटनेत एका वयोवृद्ध महिलेसह महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचार्याचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वसंतबेन शांतीलाल ठक्कर (७६) आणि सुरेश पवार (५१) यांचा समावेश आहे. याप्रकरणी मुलुंड आणि वडाळा टी टी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन दोन्ही आरोपीना अटक केली आहे.
पहिला अपघात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता वडाळा येथील शांतीनगर, बगळा गार्डनजवळ झाला. प्रविण बाबूराव पवार हा सफाई कर्मचारी असून तो वडाळा येथे राहतो. तो महानगरपालिकेत कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून कामाला आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता तो त्याचे तीन सहकारी सुरेश पवार, कुसूम राठोड आणि विनोद चव्हाण यांच्यासोबत साफसफाईचे काम करत होता. यावेळी वडाळ्यातून चेंबूरच्या दिशेने जाणार्या कचरा वाहून नेणार्या हायड्रा के्रन या वाहनाने काम करणार्या सुरेश पवारला धडक दिली होती. चाकाखाली हायड्रा क्रेन गेल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला उपचारादरम्यान दुपारी पावणेदोन वाजता सुरेशचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी प्रविण पवार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी चालक मोहम्मद आदिल मोहम्मद युसूफ खान याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका सफाई कर्मचार्यच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
दुसरा अपघात सोमवारी सकाळी सव्वानऊ वाजता मुलुंड येथील महाकवी कालिदास रोड, टी वॉर्ड ऑफिसच्या बाजूला झाला. वसंतबेन ठक्कर ही वयोवृद्ध महिला मुलुंड येथील जे. एन रोड, पंडित इस्टेट इमारतीमध्ये राहते. सोमवारी सकाळी सव्वानऊ वाजता ती टी वॉर्ड ऑफिसच्या दिशेने जात होती. यावेळी भरवेगात जाणार्या एका रिक्षाचालकाने तिला धडक दिली होती. त्यात गंभीररीत्या जखमी झाल्याने तिला जवळच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल करणयात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी वसंतबेन यांचा मुलगा प्रति नरेश लखधीर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी महादेव शंकर चव्हाण या रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
परळ येथील अपघातात दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू
तिसरा अपघात बुधवारी सकाळी पावणेअकरा वाजता परळ येथील डॉ. बी. ए रोड, नरे पार्क मैदान रोडच्या दक्षिण वाहिनीवर झाला. एका खाजगी कंपनीत कामाला असलेले मनोज शांताराम पवार हे त्यांचे आई-वडिल, भाऊ, पत्नी विद्या आणि दोन वर्षांची मुलगी श्रावी हिच्यासोबत घाटकोपर येथील पंतनगर, सयाजीनगरात राहतात. नवीन वर्षांचा पहिला दिवस असल्याने त्यांनी भायखळा येथील राणीच्या बागेत जाण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे बुधवारी सकाळी ते त्यांच्या स्कूटरवरुन त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत निघाले. नरे मैदान रोड, दक्षिण वाहिनीवरुन जाताना त्यांची स्कूटर स्लीप होऊन ते खाली पडले होते. यावेळी तेथून जाणार्या टेम्पोची धडक लागून ते तिघेही जखमी झाले. अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी जखमी तिघांनाही तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे मनोज आणि विद्या यांच्यावर उपचार सुरु आहेत तर श्रावीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी मनोज पवार यांची पोलिसांनी जबानी नोंदवून आरोपी टेम्पोचालकाविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर चालक घटनास्थळाहून पळून गेला असून त्याचा पोलीस शोध घेत आहे. नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी राणीच्या बागेत फिरायला जाणार्या पवार कुटुंबियांवर शोककळा पसरली होती.