मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 ऑगस्ट 2025
मुंबई, – शहरात तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर तीनजण जखमी झाले. जखमींमध्ये दोन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. प्राथमिक औषधोपचारानंतर तिघांनाही घरी पाठविण्यात आले आहे. मृतांमध्ये जगदीश ऊर्फ जग्गू , गणेश शाह आणि मनोजकुमार पंदारी गौड यांचा समावेश आहे. याप्रकरणी सांताक्रुज, विक्रोळी आणि गावदेवी पोलिसांनी तीन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे. याच गुन्ह्यांत एका रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली तर मर्सिडीज कारचालक आणि बाईकस्वार असे दोन्ही चालक अपघातानंतर पळून गेले होते. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या चालकांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पहिला अपघात रविवारी सायांकळी सहा वाजता विक्रोळीतील बिंदू माधव ठाकरे चौक सिग्नल, पवईकडून टागोरनगरकडे जाणार्या वाहिनीवर झाला. ज्योती रमेश गिते या कांजूरमार्ग येथे राहत असून सध्या विक्रोळी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. रविवारी सकाळी आठ वाजता त्या कर्तव्यावर हजर झाल्या होत्या. यावेळी त्यांना माधव बिंदू ठाकरे चौक सिग्नलजवळ अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीनंतर विक्रोळी पोलिसांनी तिथे धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आला. त्यामुळे त्याला तातडीने महात्मा ज्योतिबा फुले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे जखमी तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. चौकशीदरम्यान मृत व्यक्तीचे नाव मनोजकुमार गौड असल्याचे उघडकीस आले. तो विक्रोळीतील सूर्यानगर परिसरात राहत होता. त्याला हॉस्पिटलमध्ये नेताना रिक्षाचालकाने सायबानी पाणीग्राही आणि चंद्रादेवी वर्मा आणि राधामोहन विश्वनाथ पाणीग्राही यांना धडक दिली. त्यामुळे त्यांच्यावर तिथे प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. याप्रकरणी रिक्षाचालक जालिंदर भिमाजी डोंगरे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत ताब्यात घेतल्यानंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
दुसरा अपघात शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजता सांताक्रुज येथील जुहू-तारा रोड, एसएनडीटी कॉलेज बसस्टॉपसमोर झाला. अनितादेवी गणेश शाह ही महिला जुहू-कोळीवाडा परिसरात राहते. मृत गणेश हे तिचे पती असून ते बिगारीकाम आणि प्लंबरचे काम करत होते. शुक्रवारी सकाळी सात वाजता ते कामानिमित्त बाहेर गेले होते. एसएनडीटी कॉलेज बसस्टॉपसमोरुन रस्ता क्रॉस करताना त्यांना भरवेगात जाणार्या एका बाईकस्वाराने धडक दिली होती. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जखमी अवस्थेत त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे गणेश यांना घरी आणण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना पुन्हा कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सकाळी सहा वाजता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी अनितादेवी शाह हिच्या तक्रारीवरुन सांताक्रुज पोलिसांनी अज्ञात बाईकस्वाराविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून एका पादचार्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पळून गेलेल्या बाईकस्वाराचा पोलीस शोध घेत आहेत.
तिसर्या अपघातात जगदीश ऊर्फ जग्गू या व्यक्तीचा मृत्यू झाला. पार्वती अर्जुन कालियन ही महिला धारावी येथे राहत असून मनपामध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला आहे. जगदीश हा तिच्या परिचित आहे. गुरुवारी 31 जुलैला तो बाबूलनाथ चौकी, ओरियंटल क्लबजवळ दारुच्या नशेत रस्त्यावर झोपला होता. त्याला स्थानिक लोकांनी उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची काहीच हालचाल नव्हती. त्यामुळे ही माहिती गावदेवी पोलिसांना देण्यात आली. चौकशीदरम्यान त्याला एका मर्सिडिज कारने धडक दिली होती. छातीवरुन कारचे चाक गेल्याने तो जखमी झाला. त्यामुळे त्याला नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पार्वती कालियन हिच्या तक्रारीवरुन गावदेवी पोलिसांनी मर्सिडिज कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपी चालक मृत जगदीशला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलीस शोध घेत आहेत.