मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 सप्टेंबर 2025
मुंबई, – ड्रग्ज तस्करीच्या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत पाचजणांना बांगुरनगर, वनराई आणि कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. त्यात एका महिलेसह दोन विदेशी नागरिकांचा समावेश आहे. या तिन्ही कारवाईत पोलिसांनी सव्वाआठ लाख रुपयांचा एमडीसह हेरॉईन आणि कोकेनचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस तर एका आरोपी न्यायायीन कोठडी सुनावली आहे.
मुंबई शहरात ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी, गस्तीवर अधिक भर दिला होता. 22 सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयमाला वसावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक इनामदार, महिला पोलीस उपनिरीक्षक कविता देवरे, पोलीस हवालदार गायकवाड, सणस, पोलीस शिपाई कोकणी आदीचे एक पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी या पथकाला बोरिवलीतील दौलतनगर, नूतननगर रेल्वे पटरीजवळ एक तरुण संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना हेरॉईन सापडले. या हेरॉईनची किंमत दिड लाख रुपये होती. चौकशीत त्याचे नाव समीर शौकत अली असल्याचे उघडकीस आले. समीर हा दहिसर येथे राहत असून बोरिवली येथे हेरॉईन विक्रीसाठी आल्याचे उघडकीस आले.
दुसर्या कारवाईत वनराई पोलिसांनी दोन विदेशी नागरिकांना अटक केली. सैबी राऊल ऊर्फ उकेन्ना गोडवीन आणि एनडुसी उमा अजा अशी या दोघांची नावे असून ते दोघेही नायजेरीयन आणि आयव्हरी कोस्टचे नागरिक आहे. या दोघांकडून पोलिसांनी दिड लाखांचे कोकेन जप्त केले आहे. शुक्रवारी ते दोघेही गोरेगाव येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, व्हेटनरी रुग्णालयासमोर हेरॉईन विक्रीसाठी आले होते. यावेळी पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक महेश महाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण तुपारे, पोलीस हवालदार पाटील, साळुंखे, तेली, पोलीस शिपाई नवलू, शिंदे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून दोन्ही विदेशी नागरिकांना अटक केली. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अन्य एका कारवाईत बांगुरनगर पोलिसांनी विशाल मुरारी गुप्ता आणि अंजली अजय ठाकूर या दोघांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी सव्वापाच लाखांचा 52 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. बुधवारी रात्री उशिरा पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमीत शितोळे, पोलीस उपनिरीक्षक पियुष टारे, सहाय्यक फौजदार कर्पे, पोलीस हवालदार संकपाळ, पोलीस शिपाई आवळकर, पोलीस शिपाई खेडकर आदीचे पथक गोरेगाव येथील लिंक रोड, भगतसिंग नगर परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलिसांनी विशाल गुप्ता याला अटक केली होती. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना सव्वापाच लाखांचे एमडी ड्रग्ज सापडले होते.
चौकशीत त्याला ते एमडी ड्रग्ज अंजली ठाकूर हिने दिल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. तपासात अंजली ठाकूर ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिच्याविरुद्ध बांगुरनगर पोलीस ठाण्यात चार, गोरेगाव पोलीस ठाण्यात एक आणि कांदिवली युनिटमध्ये दोन एनडीपीएससह इतर गुन्ह्यांची नोंद आहे. या पाचही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर पाचही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. समीरला न्यायालयीन तर इतर चौघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.