तीन वेगवेगळ्या घटनेत सव्वाकोटीच्या दागिन्यांचा अपहार

बीकेसी-एल.टी मार्ग पोलिसांत तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जुलै 2025
मुंबई, – तीन वेगवेगळ्या घटनेत सुमारे सव्वाकोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन तीन व्यापार्‍यांची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे आणि झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आले आहे. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध वांद्रे आणि एल. टी मार्ग पोलिसांनी तीन वेगवेगळ्या अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात तरुण मांगीलालजी गेहलोत, महेंद्र जैन, जयेश वागडिया आणि रंजीत माल यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हितेश ग्यानमल जैन हे अंधेरीतील रहिवाशी असून ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा झव्हेरी बाजार येथे एक ज्वेलर्स शॉप आहे. तरुण गेहलोत हा त्यांच्या परिचित ज्वेलर्स व्यापारी आहेत. मार्च आणि एप्रिल 2025 या कालावधीत त्याने त्यांच्याकडून सुमारे 42 लाख रुपयांचे 675 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने क्रेडिटवर घेतले होते. या दागिन्यांच्या मोबदल्यात त्यांना शुद्ध सोने देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्याने शुद्ध सोने न देता तसेच दागिन्यांचे पेमेंट न करता हितेश जैन यांची फसवणुक केली होती. फसवणुकीनंतर तरुण गेहलोत हा पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.

अशाच दुसर्‍या घटनेत एका सोने कारागिराच्या नोकराने सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या 57 लाखांच्या शुद्ध सोन्याचा अपहार करुन पलायन केले. 38 वर्षांचें तक्रारदार सोने कारागिर असून ते डोबिवली परिसरात राहतात. त्यांचा झव्हेरी बाजार परिसरात सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. याच कारखान्यात रंजीत माल हा कारागिर म्हणून कामाला असून तो तक्रारदाराचा अत्यंत विश्वासू कर्मचारी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत त्यांना एका व्यापार्‍याने विविध सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिले होते. त्यामुळे त्यांनी रंजीत माल याला 57 लाख रुपयांचे 716 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिले होते. मात्र रंजीतने सोन्याचे दागिने बनवून न देता त्यांनी दिलेल्या 57 लाखांच्या शुद्ध सोन्याचा अपहार करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर तक्रारदाराच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याचा संपर्क होऊ शकला नाही. या घटनेनंतर त्यांनी त्याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.

तिसर्‍या घटनेत सोन्याचे बिस्कीट देतो असे सांगून एका ज्वेलर्स व्यापार्‍याची 22 लाखांची फसवणुक करण्यात आली. 38 वर्षांचे तक्रारदार ज्वेलर्स व्यापारी असून त्यांचा झव्हेरी बाजार येथे एक ज्वेलर्स शॉप आहे. जानेवारी महिन्यांत त्यांना महेंद्र जैन याचा कॉल केला होता. त्याने तो ज्वेलर्स व्यापारी असून त्याचे राजस्थानच्या उदयपूर येथे सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगितले. त्याने त्यांच्याकडे विविध डिझाईनच्या सोन्याच्या बांगड्याची ऑर्डर दिली होती. 22 लाखांच्या 266 ग्रॅम बांगड्याच्या मोबदल्यात त्याने त्यांना शंभर ग्रॅम वजनाचे तीन सोन्याचे बिस्कीट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दागिने घेतल्यानंतर महेंद्र आणि जयेशने त्यांच्या कर्मचार्‍याला नकली सोन्याचे बिस्कीट देऊन गंडा घातला होता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी बीकेसी पोलिसांत महेंद्र जैन आणि जयेश वागडिया या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अशाच अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. काही आरोपींना पोलिसांनी बीकेसी पोलिसांनी अटक केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page