घरफोडीच्या तीन गुन्ह्यांत 23 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविली
व्यावसायिकासह एनआयए-सशस्त्र विभागाच्या हवालाराच्या घराचा समावेश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 एप्रिल 2025
मुंबई, – घरफोडीच्या तीन गुन्ह्यांत सुमारे 23 लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला. याप्रकरणी भोईवाडा, वरळी आणि गावदेवी पोलिसांनी तीन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यात एका व्यावसायिकाच्या बंगलोसह दोन पोलीस अंमलदाराच्या फ्लॅटचा समावेश आहे. चोरट्यांनी पोलिसांच्या घरात घुसून चोरी केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पहिली घरफोडीची घटना रविवार 20 एप्रिलला गावदेवी येथील स्लेटर रोड, बोयस बंगलो क्रमांक 34/4 मध्ये घडली. याच बंगलोमध्ये तक्रारदार परेश वालजी शहा हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा स्टेशनरी आणि प्रिटींगचा व्यवसाय आहे. त्यांची जागा पुर्नविकासासाठी जाणार असल्याने तसेच त्यांची मुलगी प्रसुतीसाठी त्यांच्या घरी आल्याने त्यांनी ग्रॅटरोड येथील नवजीवन सोसायटीसमोरील पद्मावती हाईट्स अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. यावेळी दैनदिन गरजेचे वस्तू तिथे नेले आणि उर्वरित सामान त्यांनी जुन्याच घरी ठेवले होते. शनिवारी 19 एप्रिलला रात्री उशिरा त्यांच्या बंगलोमध्ये अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन कपाटातील सुमारे 21 लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. त्यात सोन्याचे बार, विविध सोन्याचे व हिर्यांचे दागिने आदींचा समावेश होता. हा प्रकार त्यांचा लँडलॉर्ड मनिष शहा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही माहिती परेश शहा यांना दिली होती. कपाटातील 21 लाख 21 हजार 662 रुपयांचे बार आणि दागिने चोरट्याने चोरी करुन पलायन केले होते. त्यामुळे त्यांनी गावदेवी पोलिसांना ही माहिती दिली.
दुसर्या घटनेत अज्ञात चोरट्याने 1 लाख 39 हजाराचा मुद्देमाल चोरी केला. नितीन वसंत पवार हे दादर येथील राधाकृष्णा निवास इमारतीमध्ये राहत असून सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेत हवालदार म्हणून कार्यरत आहेत. रविवारी 20 एप्रिलला त्यांची मोठी बहिण राजश्री कबरे हिने त्यांना कुटुंबियांसोबत तिच्या गोरेगाव येथील राहत्या घरी जेवणासाठी बोलाविले होते. त्यामुळे ते सर्वजण गोरेगाव येथे गेले होते. यावेळी त्यांच्या घरात कोणीही नव्हते. ही संधी साधून दुपारी साडेबारा ते सायंकाळी सव्वाचार वाजता या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील विविध सोन्याचे दागिने, चांदीचे ग्लास, नाणी, मूर्ती, घड्याळ आणि पाच हजाराची कॅश असा 1 लाख 39 हजाराचा मुद्देमाल चोरी केला होता. सायंकाळी हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी भोईवाडा पोलिसांत घरफोडीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.
वरळी येथील तिसर्या घटनेत चोरट्याने 40 हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले. प्रमोद विश्वनाथ कांबळे हे वरळीतील वरळी दूध डेअरी कामगार वसाहतीत राहत असून सध्या नायगाव सशस्त्र पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. 17 एप्रिलला रात्री ते त्यांच्या कुटुंबियांसोबत घरात झोपले होते. रात्री पावणेतीन वाजता त्यांना त्यांच्या घरात काहीतरी आवाज ऐकू आला. त्यामुळे त्यांना जाग आली असता त्यांना त्यांच्या घरात त्यांच्या परिचित अकू ऊर्फ हुसैन साजिद आणि आरिफ ऊर्फ सोनू मोहम्मद अब्बास शेख हे दोघेही चोरीच्या उद्देशाने घुसल्याचे दिसून आले. कपाटातील दागिने काढण्याचा प्रयत्नात असलेल्या या दोघांना त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघेही पळून गेले. काही वेळानंतर त्यांना ते दोघेही कपाटातील मंगळसूत्र आणि एक मोबाईल असा 40 हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पळून गेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी दोन्ही आरोपीविरुद्ध वरळी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अकू आणि आरिफ यांच्याविरुद्ध पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. तपासात ते दोघेही खिडकीतून त्यांच्या घरात घुसल्याचे उघडकीस आले आहे.