मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – डोंगरी येथे राहणार्या सहा आणि आठ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचा त्यांच्याच परिचित आरोपीने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डोंगरी आणि पायधुनी पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन एका आरोपीस अटक केली तर पळून गेलेल्या दुसर्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
४० वर्षांची तक्रारदार महिला डोंगरी येथे राहत असून तिला आठ वर्षांची नात आहे. शुक्रेवारी रात्री पावणेदहा वाजता ती सोसायटीचा जिना चढून घरी जात होती. यावेळी तिथे तिच्या परिचित २३ वर्षांचा आरोपी तरुण आला आणि त्याने तिला पकडून तिच्या गालाचा जोरात चावा घेतला. त्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या आजीला सांगितला. त्यानंतर तिने डोंगरी पोलिसांत आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आरोपी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
डोंगरीतील अन्य एका घटनेत एका सहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही मुलगी डोंगरी येथे राहते. ११ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ४० वर्षांच्या आरोपीने या मुलीशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील चाळे केले होते. तिच्यावर लैगिंक हल्ला करुन तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार मुलीकडून तिच्या वडिलांना समजताच त्यांनी पायधुनी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
मानखुर्द येथे तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
मानखुर्द येथील अन्य एका घटनेत चार, दहा आणि बारा वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलींच्या त्यांच्याच शेजारी राहणार्या एका ४० वर्षांच्या व्यक्तीने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीस मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. २८ वर्षांची तक्रारदार महिला ही मानखुर्द येथे राहत असून तिच्याच शेजारीच आरोपी राहतो. तो हाऊसकिपिंगचे काम करतो. १२ फेब्रुवारी आणि १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत तिची चार वर्षांची मुलगी शेजारी राहणार्या दहा आणि बारा वर्षांच्या मुलीसोबत घरासमोरच खेळत होती. यावेळी आरोपींनी या तिन्ही मुलींशी अश्लील चाळे करुन त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा विनयभंग केला होता. हा प्रकार नंतर या मुलीकडून तिच्या आईला समजताच तिने मानखुर्द पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.