मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2025
मुंबई, – शहरात तीन वेगवेगळ्या घटनेत पाच ते बारा वर्षांच्या सहा अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तिन्ही घटना अॅण्टॉप हिल, वांद्रे आणि मानखुर्द परिसरात घडली. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच काही तासांत तिन्ही आरोपी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही आरोपी बळीत मुलीच्या परिचित असून एकाच परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर तिघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
35 वर्षांची तक्रारदार महिला ही मानखुर्द येथे राहत असून ती हाऊसकिपिंगचे काम करते. तिला अकरा आणि नऊ वर्षांच्या दोन मुली आहेत. रविवारी सायंकाळी साडेचार वाजता त्या दोघीही एका रिक्षात बसून अभ्यास करत होत्या. यावेळी तिथे 34 वर्षांचा आरोपी वॉर्डबॉय व्यक्ती आला. त्याने त्याच्या मोबाईलवर दोन्ही मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार एका मुलीने तिच्या आईला सांगताच तिने मानखुर्द पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी वॉर्डबॉयला पोलिसांनी अटक केली. बळीत मुली आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत.
दुसर्या घटनेत एका 23 वर्षांच्या तरुणाने त्यांच्याच परिचित अकरा आणि पाच वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलींशी अश्लील हातवारे करुन बोलाविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सोनू नावाच्या आरोपी तरुणाला अॅण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली. सोमवारी सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान सोनूने त्याच परिसरात राहणार्या एका अकरा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करुन तिच्या मानेवर नकोसा स्पर्श केला होता. तिचा विनयभंग करण्याचा उद्देशाने तिला हातवारे आणि हावभाव करुन बोलविण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारे त्याने पाच वर्षांच्या इतर दोन मुलीशी अश्लील हावभाव करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार समजताच मुलीच्या पालकांनी त्याला विचारणा केल्यानंतर त्याने आपण काहीच केले नाही. मला जाऊ द्या, नाहीतर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करुन घेईल अशी धमकी दिली होती. मात्र बळीत मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर त्याला नंतर पोलिसांनी अटक केली.
तिसरी घटना वांद्रे परिसरात घडली. 34 वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या बारा वर्षांच्या मुलीसोबत वांद्रे येथील एका कार्यक्रमांत आली होती. यावेळी त्यांच्याच परिचित एका 24 वर्षांच्या आरोपी तरुणाने बारा वर्षांच्या मांडीसह पायावर अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. तिने तिच्या आईला हा प्रकार सांगताच तिने वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली. आरोपी हा तक्रारदार महिलेच्या परिचित असून ते एकाच परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर तिन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.