मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 एप्रिल 2025
मुंबई, – शहरात तीन वेगवेगळ्या घटनेत आठ वर्षांच्या दोन मुलीसह अकरा वर्षांच्या एका मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार कफ परेड, चेंबूर आणि शिवडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कफ परेड, आरसीएफ आणि रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी तीन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन एका आरोपीस अटक केली तर पळून गेलेल्या एका मौलवीसह तरुणाचा शोध घेत आहेत. शनिवारी हा प्रकार उघडकीस येताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
20 वर्षांची तक्रारदार तरुणी ही वरळी परिसरात राहते. बळीत अकरा वर्षांची मुलगी तिची लहान बहिण आहे. 23 एप्रिलला 25 वर्षांच्या आरोपीने तिला कफ परेड परिसरातील त्याच्या घरी आणले होते. घरी आणल्यानंतर त्याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले होते. बेशुद्ध होताच त्याने तिचे कपडे काढून तिच्या पोटाला, छातीला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. तसेच मोबाईलवर तिचे अश्लील चित्रीकरण करुन ते सोशल मिडीयावर अपलोड केले होते. हा प्रकार शनिवारी तिच्या बहिणीच्या लक्षात येताच तिने कफ परेड पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीस अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
दुसरी घटना चेंबूर परिसरात घडली. आठ वर्षांची ही मुलगी तिच्या पालकांसोबत तिथे राहते. याच परिसरात 26 वर्षांचा आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. 24 एप्रिल ते 26 एप्रिल 2025 या कालावधीत त्याने बळीत मुलीला चॉकलेट देतो असे सांगून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्या छातीसह इतर ठिकाणी नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभं केला होता. हा प्रकार शनिवारी मुलीकडून तिच्या आईला समजताच तिने आरसीएफ पोलिसांत आरोपीविरुद्घ तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
ही घटना ताजी असताना तिसरी घटना शिवडी परिसरात घडली. याच परिसरात राहणार्या एका आठ वर्षांच्या मुलीचा मौलवीने विनयभंग केला होता. बळीत मुलगी चेंबूर येथे राहते असून याच परिसरात आरोपी मौलवी राहतो. 22 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत बळीत मुलीशी आरोपीने अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगितले. तिने तिच्या वडिलांना हा प्रकार सांगताच त्यांनी आरएके मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपी मौलवीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी पळून गेले असून त्यांचा आरसीएफ आणि आरएके मार्ग पोलिसांकडून शोध सुरु आहे.