मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बुधवारी दिवसभरात तीन वेगवेगळ्या घटनेत तीन अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन तिघांनी विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तिन्ही घटना ऍण्टॉप हिल, वडाळा आणि नागपाडा परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तीन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली तर पळून गेलेल्या एका आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिल्या गुन्ह्यांतील तेरा वर्षांची मुलगी ऍण्टॉप हिल येथे राहते. १७ ऑगस्टला ती तिच्या घरासमोरच खेळत होती. यावेळी नदीम ऊर्फ आरिफ नावाच्या एका ३० वर्षांच्या तरुणाने तिची ओढणी खेचून तिला त्याच्या घरी आणले. तिथे त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने तिचा तोंड दाबून तिला हा प्रकार कोणालाही सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर बुधवारी ४ सप्टेंबरला त्याने तिच्याशी पुन्हा अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी तिला ऍण्टॉप हिल पोलीस ठाण्यात आणले होते. या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नदीमविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
नागपाड्यातील दुसर्या घटनेत एका चौदा वर्षांच्या शाळकरी मुलीचा एका २४ वर्षांच्या तरुणाने विनयभंग केलाा. बुधवारी ४ सप्टेंबरला सकाळी सात वाजता ही मुलगी शाळेत जात होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने तिला मोबाईलवरुन काहीतरी दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने तिला पाच हजार देतो असे सांगून त्याच्यासोबत येण्याची ऑफर देत तिच्याशी अश्लील संभाषण केले होते. घरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने नागपाडा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली.
वडाळा येथील एका बारा वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही मुलगी वडाळा परिसरात राहत असून बुधवारी रात्री नऊ वाजता हनुमान मंदिर परिसरातून जात होती. यावेळी तिथे निसार नावाचा आरोपी आला आणि त्याने तिला भजी खाण्यास देतो असे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर त्याने तिच्या मांडीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर ती प्रचंड घाबरली आणि घरी पळून आली. घडलेला प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. तिच्या आईच्या तक्रारीनंतर निसारविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेल्याने त्याचा वडाळा टी टी पोलिसांकडून शोध सुरु आहे.