मित्रांचा फोटो लावून बोगस मॅसेज पाठवून दोघांची फसवणुक

फसवणुकीसह आयटीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 मे 2025
मुंबई, – मित्रांचा फोटो लावून बोगस मॅसेज पाठवून दोन व्यक्तींची अज्ञात सायबर ठगांनी ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार मालाड आणि जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालाड आणि ओशिवरा पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

पहिली घटना मालाड येथे घडली. तक्रारदार हे सेवानिवृत्त आहेत. त्याचा एक मित्र अमेरिकेत राहतो. ते त्याच्या मित्राच्या नियमित संपर्कात असतात. त्याने मित्राचा व्हाट्सअप ग्रुप बनवला आहे. दोन दिवसापूर्वी त्याना मेसेज आला. त्या नंबरवर त्याच्या मित्राचा फोटो दिसला. तो मेसेज मित्राने पाठवला असे त्याना वाटले. त्यानंतर त्याने मेसेजवर बोलण्यास सुरुवात केली. मेसेजवर बोलत असताना त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर त्याना बँक खात्याचे तपशील पाठवण्यात आले. त्यावर विश्वास ठेऊन त्याने पैसे ट्रान्स्फर केले. पैसे पाठवल्यानंतर तक्रारदार याने व्हॉइस कॉल करण्यास सांगितले. मात्र ठगाने त्याना कॉल केला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने त्याच्या मित्राला फोन केला. तेव्हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यावर त्याने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरु केला.
तर दुसरी घटना जोगेश्वरी येथे घडली. जोगेश्वरी येथे राहणारे तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्याचा एक मित्र दुबई येथे राहतो. दोन दिवसापूर्वी ते कार्यालयात असताना त्याना फेसबुकवर मेसेज आला. आपला व्हिसा संपत असून खात्यात ५ लाख ५० हजार रुपये ट्रान्स्फर करत असल्याचे त्याना भासवण्यात आले. त्यावर विश्वास ठेऊन त्याने बँक खात्याचा तपशील पाठवला. त्यानंतर त्याना व्हाट्स अपवर फोन आला. उद्या पर्यंत पैसे पाठवू असे त्याना सांगण्यात आले. एक एजंट ला संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार याने त्या एजंट ला संपर्क केला. तक्रारदार याने एका खात्यावर १ लाख रुपये पाठवले. पैसे पाठल्यानंतर एजंट ने त्याना पुन्हा फोन केला. व्हिसा क्लेअर झाला नसून त्यास आणखी १ लाख रुपये दंड लागला आहे असे त्याना सांगण्यात आले. मित्राला मदत म्हणून त्याने पुन्हा १ लाख रुपये पाठवले. पैसे पाठवल्यानंतर ठगाने त्याना पुन्हा फोन करून आणखी पैशाची मागणी केली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने मित्राकडे चौकशी केली. तेव्हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. ठगाने त्या व्यक्तीचे फेसबुक हॅक केल्याने त्याने तक्रारदार याना सांगितले. ४ लाख रुपयाची फसवणूक केल्या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
अन्य एका गुन्ह्यांत वयोवृद्धाची फसवणुक

अन्य एका गुन्ह्यांत एका वयोवृद्धाची सायबर ठगांनी सुमारे चार लाखांची फसवणुक केली. क्रेडिट कार्ड अ‍ॅक्टिव्ह करण्याचा बहाणा करुन ही फसवणुक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मालाड पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. 71 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मूळचे गोव्याचे रहिवाशी असून त्यांची वयोवृद्ध आई मालाड येथे राहते. तिचे वय सध्या 100 असून तिची प्रकृती ठिक नसल्याने ते गेल्या पाच वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे एका बँकेचे क्रेडिट कार्ड होते. या क्रेडिट कार्डची मुदत 1 मे 2025 संपली होती. त्यामुळे बँकेने त्यांना नवीन क्रेडिट कार्ड पाठविले होते, मात्र गोव्याच्या घरी राहत नसल्याने ते क्रेडिट कार्ड परत गेले होते. त्यानंतर त्यांनी मालाड येथील बँकेत जाऊन क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला होता. या अर्जानंतर त्यांना बँकेने दोन क्रेडिट कार्ड पाठविले होते. मात्र त्यांनी अर्ज केलेले ते क्रेडिट कार्ड नव्हते. दोन दिवसांपूर्वी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. नवीन क्रेडिट कार्ड अ‍ॅक्टिव्ह करण्याचा बहाणा करुन त्याने त्यांच्याकडे ओटीपी क्रमांक मागितले होते. मात्र त्यांनी ते दोन्ही क्रेडिट नको आहेत असे सांगितले. यावेळी या व्यक्तीने ते कार्ड अ‍ॅक्टिव्ह केल्यानंतर डिअ‍ॅक्टिव्ह होईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला ओटीपी क्रमांक शेअर केले होते. ते ओटीपी क्रमांक शेअर केल्यानंतर त्यांच्या कार्डवरुन चार लाख आठ हजार रुपयांचे काही ऑनलाईन व्यवहार झाले होते. याबाबतचा मॅसेज प्राप्त होताच त्यांना फसवणुकीचा हा प्रकार समजला होता. त्यानंतर त्यांनी मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page