चौदा व पंधरा वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
दोन घटनेत पिडीत मुली गरोदर; एकाला अटक तर दोघांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – चौदा आणि पंधरा वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलींवर त्यांच्याच परिचित व्यक्तीने लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार खार, कांदिवली आणि कुर्ला परिसरात उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी खार, चारकोप आणि विनोबा भावे नगर पोलिसांनी तीन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत एका आरोपीला पोलिसांनी अटक केली तर इतर दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. यातील दोन घटनेतील दोन्ही पिडीत मुली गरोदर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रादार महिला कांदिवली परिसरात राहत असून पिडीत साडेचौदा वर्षांची मुलगी तिची भाची आहे. ५० वर्षांचा आरोपी याच परिसरात राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत त्याने पिडीत मुलीला खाऊ देण्याचा बहाणा करुन त्याच्या घरी आणले होते. ती अल्पवयीन असल्याची माहिती असताना त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. काही दिवसांनी त्याने तिला तांदळाच्या पेजमधून गुंगीचे औषध दिले होते. बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्यावर पुन्हा लैगिंक अत्याचार केला होता. या घटना नोव्हेंबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीत झाल्या होत्या. याबाबत कोणालाही काहीही सांगू नकोस अशी सांगून त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. अलीकडेच तक्रारदार महिलेने तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले होते. यावेळी डॉक्टरांनी ती सात ते आठ महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर या महिलेने आरोपीविरुद्ध चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध ३७६ (२), (एन), ३२८, ५०६ (२) भादवी सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
दुसर्या घटनेत एका पंधरा वर्षांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तिच्याच मित्राने लैगिंक अत्याचार केला. तक्रारदार महिला ही कुर्ला येथे राहत असून तिला पंधरा वर्षांची मुलगी आहे. आरोपी हा तिच्या परिचित असून त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर मे ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. अलीकडेच तिची प्रकृती बिघडल्याने तिच्या आईने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने आरोपी मित्राविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच २२ वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तिसर्या घटनेत एका ६५ वर्षांच्या वयोवृद्धाने पंधरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिडीत मुलगी खार येथे राहत असून सध्या शिक्षण घेते. तिला अहमदनगर येथील एका शिशुगृहातून दत्तक म्हणून आणण्यात आले होते. एप्रिल ते जुलै २०२४ या कालावधीत फ्लॅटच्या वयोवृद्ध मालकाने तिच्याशी अनेकदा अश्लील चाळे करुन जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या पिडीत मुलीची खार पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली होती. या तक्रारीनंतर वयोवृद्धाविरुद्ध ६४, ७४, ७५, ७९ भारतीय न्याय सहिता सहकलम ४, १०, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत वयोवृद्धाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध घेत आहेत.