मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जानेवारी २०२५
मुंबई, – मालाडच्या मालवणी परिसरात माणुसकीला फासणारी आणखीन एक घटना उघडकीस आली आहे. पित्यानेच त्याच्या बारा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी ४१ वर्षांच्या आरोपी पित्याविरुद्ध मालवणी पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. गेल्या काही महिन्यांतील मालवणीतील अशा प्रकारची ही तिसरी घटना असून मुली स्वताच्या घरातच सुरक्षित नसल्याचे या घटनेवरुन दिसून येत आहे.
४६ वर्षांची तक्रारदार महिला ही मालवणी परिसरात राहत असून ती टेलरिंगचे काम करते. तिला बारा वर्षांची एक मुलगी असून ती शारीरिक दृष्ट्या विकलांग आहे. तिला कमी ऐकायला येते आणि बोलता येत नाही. त्याचाच फायदा तिच्या पित्याने घेतला होता. घरात कोणीही नसताना पित्यानेच या पिडीत मुलीवर चार ते पाच वेळा लैगिंक अत्याचार केला होता. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला होता. चार वर्षांनी हा प्रकार पिडीत मुलीकडून तिच्या आईला समजला आणि तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने मालवणी पोलिसांना हा प्रकार सांगून आरोपी पतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून पळून गेलेल्या पित्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. गेल्या काही महिन्यांत अशाच प्रकारच्या दोन ते तीन घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
लैगिक अत्याचारानंतर अश्लील फोटो व्हायरल केले
शिवडी येथील दुसर्या घटनेत एका तेरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच परिचित तरुणाने लैगिंक अत्याचार केला, तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिचे अश्लील फोटो व्हायरल करुन तिची बदनामी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकणी आफ्ताब नावाच्या २२ वर्षांच्या आरोपीविरुद्ध शिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तेरा वर्षांची ही मुलगी घोडपदेव परिसरात राहते. आरोपी हा तिच्या परिचित असून गेल्या गणेशोत्सवापूर्वी त्याने तिला शिवडी येथून आणून तिच्याशी लग्न करुन तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिचे अश्लील फोटो काढले आणि ते फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी केली होती. हा प्रकार तिच्या आईला समजताच तिने शिवडी पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
गोवंडीत पाच वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार
गोवंडीतील तिसर्या घटनेत एका पाच वर्षांच्या मुलीवर लैगिंक चाळे करुन अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी २९ वर्षांच्या आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सायंकाळी पिडीत मुलगी चीज आणण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंगासह लैगिंक चाळे करुन अत्याचार केला होता. घरी आल्यानंतर तिने तिच्या आईला हा प्रकार सांगितल्यानंतर तिने आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.