पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणार्‍या तिघांवर बडतर्फीची कारवाई

सहाय्यक फौजदारासह दोन पोलीस हवालदारांचा समावेश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2026
मुंबई, – मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात राजस्थानच्या एका ज्वेलर्स व्यापार्‍याशी गैरवर्तन करुन पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी रेल्वे पोलीस दलातील एका पोलीस अधिकार्‍यासह तीन पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यात सहाय्यक फौजदार ललित रामचंद्र जगताप, पोलीस हवालदार राहुल दत्ता भोसले आणि अनिल सिताराम राठोड यांचा समावेश असून सध्या ते घाटकोपर पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. या तिघांवर कर्तव्य बजाविताना हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे.

तक्रारदार राजस्थानकातील ज्वेलर्स व्यापारी असून ऑगस्ट 2025 रोजी ते त्यांच्या कुटुंबियांसोबत रक्षाबंधनाच्या सणानिमित्त त्यांच्या बहिणीकडे आले होते. रक्षाबंधनानंतर ते राजस्थानला जाण्यासाठी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात आले होते. यावेळी तिथे उपस्थित तीन रेल्वे पोलिसांनी त्यांच्या सामानाची तपासणी न करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे उकाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर हल्ला केला होता. घडलेला प्रकार या ज्वेलर्स व्यापार्‍याने सोशल मिडीयावर व्हायरल केला होता.

हा प्रकार उघडकीस येताच त्याची पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी गंभीर दखल घेत सहाय्यक फौजदार ललित जगताप, पोलीस हवालदार अनिल राठोड आणि राहुल भोसले यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्यात आली होती. या चौकशीत त्यांनी कर्तव्य बजाविताना हलगर्जीपणा करुन ज्वेलर्स व्यापार्‍याशी गैरवर्तन केले होते. त्यामुळे त्याला पोलिसांविषयी असुरक्षित वाटत होते.

संशयित व्यक्तीच्या सामानाची तपासणी करण्याची जबाबदारी असताना त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसून केला होता, वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लघंन केले होते. बेशिस्त, बेजबाबदारपणा तसेच पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल असे कृत्य केले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी तिन्ही पोलिसांवर आता बडतर्फीची कारवाई केली होती. पोलीस दलात अशा बेशिस्तपणा अजिबात खपवून घेतला जाणार असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page