बोरिवली, चुन्नाभट्टी, मुलुंडमध्ये तिघांच्या आत्महत्या
महिलेने इमारतीवरुन उडी घेतली तर दोघांनी गळफास घेतला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – बोरिवली, चुन्नाभट्टी आणि मुलुंड येथील तीन वेगवेगळ्या घटनेत तिघांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील एका घटनेत महिलेने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन आत्महत्या केली तर दोघांनी गळफास घेऊन जीवन संपविले होते. आजाराला कंटाळून तर एका मद्यप्राशन करुन आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी बोरिवली, चुन्नाभट्टी आणि बोरिवली पोलिसांनी तीन स्वतंत्र एडीआरची नोंद केली आहे.
बोरिवली येथे राहणार्या एका बारच्या वेटरने गळफास घेऊन आत्महत्या केली. मोहनीलाल ग्यानप्रसाद न्योपाने असे या ३९ वर्षीय वेटरचे नाव असून त्याला दारु पिण्याचे व्यसन होते, दारुच्या नशेतच त्याने गळाला फास घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा तीन वाजता बोरिवलीतील चंदावरकर रोड, नूतननगर, साईधाम चाळीत घडली. याच चाळीत मोहनीलाल हा राहत होता. तो एका बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता. रविवारी रात्री एक वाजता तो त्याच्या घरी होता. यावेळी त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रात्री तीन वाजता हा प्रकार उघडकीस येताच सुरक्षारक्षक खऊपती ऋषीपती न्योपाने याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली होती. ही माहिती प्राप्त होताच बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी मोहनीलाल याला पोलिसांनी कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी खऊपती न्योपाने याच्यासह शेजारी राहणार्या रहिवाशी आणि नातेवाईकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून मोहनीलाल याला दारु पिण्याचे व्यसन असल्याचे उघडकीस आले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मद्यप्राशन केले होते. त्यातून त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी एडीआरची नोंद करुन बोरिवली पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मुलुंड येथे एका ५३ वर्षांच्या महिलेने इमारतीवरुन उडी घेऊन जीवन संपविले. सुनिता विजय येवले असे या महिलेचे नाव असून आजारामुळे आलेल्या मानसिक नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही घटना रविवारी सकाळी अकरा वाजता मुलुंड येथील दत्तगुरु एसआरए सहकारी सोसायटीमध्ये घडली. सुनिता ही पुण्यातील दौंड, गोपाळवाडी रोड, दत्तनगरची रहिवाशी होती. गेल्या काही वर्षांपासून सुनिता ही आजारी होती. त्यामुळे तिचे पती विजय आणि मुलगा शुभम येवले हे मुलुंड येथील तिची बहिण गायत्री अजय यादव यांच्या घरी घेऊन आले होते. सुनिताला गेल्या २७ वर्षांपासून उच्च मधुमेहचा त्रास होता. त्यातच दोन वर्षांपूर्वी तिला हार्टऍटक आला होता. दुसरीकडे तिला दहा वर्षांपासून डोळ्यांचाही आजार होता. त्यामुळे तिचे नातेवाईक तिला डोळ्यांच्या आजारावर उपचारासाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये नेणार होते. मात्र तिने सोमवारी सकाळी अकरा वाजता तिने इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिची बहिण गायत्री यादव, पती विजय येवले आणि मुलगा शुभम येवले यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतला आहे. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. तिने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे जबानीत म्हटले आहे. या जबानीनंतर मुलुंड पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती.
चुन्नाभट्टी येथे आशिष विरशेट्टी हत्ते या २९ वर्षांच्या तरुणाने स्वतच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता चुन्नाभट्टी-सायन, म्हाडा कॉलनीत घडली. या कॉलनीतील श्रीरंग सोसायटीमध्ये आशिष हा त्याच्या कुटुंबियासोबत राहत होता. त्याला निद्रनाशाचा त्रास होता. त्यावर त्याचे औषधोपचार सुरु होते, मात्र त्यातून त्याला काहीच फरक पडत नव्हता. आजारामुळे तो मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने सोमवारी सकाळी साडेआठ वाजता आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला के के सोमय्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच चुन्नाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी विरशेट्टी हत्ते यांची जबानी नोंदविण्यात आली असून त्यांनी या आत्महत्येमागे कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नव्हती. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.