ट्रिगच्या अधिकार्याकडून सिनेअभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येची सुपारी
पगार न देता कामावर काढून टाकला म्हणून बोगस कॉल केला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 एप्रिल 2025
मुंबई, – सिनेअभिनेता टायगर श्रॉफ याच्या जिवाला धोका असून त्याच्या हत्येसाठी दोन लाखांची सुपारी देण्यात आली आहे. ही हत्या त्याच्याच सुरक्षेसाठी तैनात असलेले ट्रिग कंपनीच्या काही लोकांकडून होणार असल्याचा मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल प्राप्त झाला होता. या घटनेनंतर खार पोलिसांनी तपास केला असता ही माहिती बोगस असल्याचे उघडकीस आले. कंट्रोल रुमला बोगस माहिती देऊन दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी मनिषकुमार सुजींदर सिंग या व्यक्तीविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनिषकुमार हा पूर्वी ट्रिग कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता, पगार न देता कामावरुन काढून टाकले म्हणून त्याने दोन अधिकार्यांना अडकाविण्यासाठी बोगस कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पंजाबचा रहिवाशी असलेल्या मनिषकुमारला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या अटकेसाठी एक टिम रवाना झाली आहे.
सिनेअभिनेता टायगर श्रॉफ याच्या जिवाला धोका आहे. त्याच्या हत्येसाठी त्याला दोन लाखांची सुपारी आणि हत्यार देण्यात आले आहे. ही सुपारी ट्रिग कंपनीचे ब्रॅच हेड भुपेंद्र श्रीकृष्ण दुबे आणि एरिया ऑफिसर दिनेश राजकिशोर सिंग यांनी दिली आहे. त्यामुळे या दोघांची चौकशी करा असे सांगून त्याने कॉल बंद केला होता. या माहितीने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. वरिष्ठांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी खार पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या घटनेनंतर खार पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासात या धमकीमध्ये काहीही तथ्य नसल्याचे आढळून आले. कॉल करणार्या व्यक्तीची माहिती काढल्यानंतर तो कॉल मनिषकुमार या व्यक्तीने केल्याचे उघडकीस आले. तो पंजाबचा रहिवाशी असून तेथून त्याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल केला होता. टायगर श्रॉफच्या हत्येची सुपारी दिल्याची खोटी माहिती देऊन त्याने पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक तपासात मनिषकुमार हा पूर्वी ट्रिग कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. कामात हलगर्जीपणा करत असल्याने तसेच सतत गैरहजर राहत असल्याने त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. त्याचा पगार देण्यात आला नाही. त्याच्या नोकरीला आणि पगार न देण्यामागे दिनेश सिंग आणि भुपेंद्र दुबे हेच कारणीभूत असल्याचे त्याला वाटत होते. त्यामुळे या दोघांना अडकाविण्यासाठी त्याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल करुन ही माहिती दिली होती. जेणेकरुन या दोन्ही अधिकार्यांची पोलिसांकडून चौकशी होईल, त्यांना नाहक त्रास होईल असे त्याचा त्यामागील उद्देश होता. मात्र तपासात मनिषकुमारचे सत्य समोर आले. त्यानंतर त्याला पंजाब पोलिसांच्या मदतीने चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याचा ताबा घेण्यासाठी खार पोलिसांची एक टिम लवकरच पंजाबला जाणार आहे. त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार आहे.