मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 फेब्रुवारी 2025
मुंबई, – मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील एका दुकलीस टिळकनगर पोलिसांनी अटक केली. आल्फयाज अब्दुल रौफ शेख आणि हुसैन बाबूजान शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे दोन मोबाईल हस्तगत केले आहेत. अटकेनंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगेश मलयाडी दास हे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. बुधवारी 26 फेब्रुवारीला सकाळी पावणेसहा वाजता ते चेंबूर येथील टिळकनगर कॉलनी, अॅक्सिस बॅकेजवळूनज जात होते. यावेळी बाईकवरुन आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडील 40 हजाराचा मोबाईल खेचून पलायन केले होते. त्यांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर त्यांनी टिळकनगर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती पोलिसांनी उरण, नवी मुंबई, पनवेल, माहीम, अटल सेतू मार्ग, मानखुर्द असा पाठलाग करुन एका आरोपीस ताब्यात घेतले.
चौकशीत त्यानेच त्याच्या सहकार्याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या दुसर्या सहकार्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान आल्फयाज शेख हा मानखुर्द तर हुसैन शिवाजीनगर, म्हाडा कॉलनीतील रहिवाशी आहे. ते दोघेही मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध माटुंगा, घाटकोपर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांतील चोरीचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत पवार, पोलीस निरीक्षक माने यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक पवार, राठोड, महिला पोलीस उपनिरीक्षक शिसोदे, पोलीस हवालदार संजय शिंदे, सोमनाथ पोमने, सत्यवान साटेलकर, अंबादास सानप, पोलीस शिपाई रोहित फरांदे, विनोद भोसले, काटकर, राणे यांनी केला.