मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जानेवारी २०२४
मुंबई, – दादर येथील टोरेसच्या संचालकासह तिघांना अटक करण्यात शिवाजी पार्क पोलिसांना यश आले आहे. या तिघांमध्ये कंपनीचा संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार यांचा समावेशआहे. सोमवारी गुन्हा दाखल होताच ते तिघेही मुंबईनंतर विदेशात पळून जाण्याव्या तयारीत होते. त्यापूर्वीच या तिघांवर कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने सोमवार १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कंपनीने आतापर्यंत लाखो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
दादर येथे टोरेस (प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड) कंपनीची एक शाखा असून या कंपनीचे मुंबईसह इतर शहरात अनेक शाखा आहे. कंपनीने सुरुवातीला मोजोनाईट नावाचा खडा खरेदी केलयावर त्यावर गुंतवणुक केल्यास दर आठवड्याला सहा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर विविध आकर्षक योजना सुरु अनेकांना या गुंतवणुक योजनेत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले. अनेकांना व्याजदराची रक्कम देऊन त्यांचा विश्वास संपादन केला होता. गुंतवणुक करणार्या गुंतवणुकदारांना इतरांनाही गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केल्यास मोठ्या रक्कमेचे कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाने कंपनीत गुंतवणुकदाराच्या परिचित व्यक्ती, नातेवाईक आणि मित्रमंडळीने कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली होती. गेल्या वर्षभरात दादर येथील शाखेत जवळपास एक लाखाहून अधिक गुंतवणुकदारांनी कंपनीच्या विविध गुंतवणुक योजनेत पैसे गुंतवणूक केली होती. हाच आकडा १३ कोटी ४८ लाख रुपये इतका आहे. सुरुवातीला मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम दिल्यानंतर कंपनीने काही दिवसांपासून पैसे देणे बंद केले होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच अनेक गुंतणुकदारांनी कंपनीच्या विविध शाखेत गर्दी केली होती. यावेळी कंपनीचे संचालकासह इतर पदाधिकारी पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यातून दादरच्या शाखेत अनेक गुंतवणुकदारांनी मोर्चा काढून तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर प्रदीपकुमार मामराज वैश्य या व्यक्तीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कंपनीचे संचालक सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर, महाव्यवस्थापक तानिया कॅसोतोवा आणि स्टोर इंचार्ज व्हॅलेंटीना यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच संबंधित मुख्य आरोपी मुंबईहून इतर राज्यात आणि नंतर विदेशात पळून जाण्याच्या तयारीत होते. अखेर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या कंपनीच्या संचालक अजय सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार या तिघांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही मंगळवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तिघांनाही न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तानिया ही उझबेकिस्तान तर व्हेलेंटिना ही रशियाची रहिवाशी आहे. व्हेलेटिनाने एका भारतीय नागरिकाशी लग्न केले आहे. अजय सुर्वे कंपनीचा संचालक असून त्यानेच इतरांच्या मदतीने ही फसवणुक योजना सुरु केली होती. गेल्या वर्षभरात कंपनीत अनेकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केल्याचे तपासात उघडकीस आली आहे. एफआयआरमध्ये ही फसवणुक तेरा कोटीची असली तरी हा आकडा त्यापेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपींनी या पैशांची कुठे विल्हेवाट लावली, कुठे गुंतवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पाहिजे आरोपींविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केले आहे.