टोरेस कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी आरोापत्र सादर
कंपनीसह सातजणांविरुद्ध 27 हजार 147 पानांचे आरोपपत्र
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 मार्च 2025
मुंबई, – दादर येथील टोरेस कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी एका खाजगी कंपनीसह सातजणांविरुद्ध आरोपपत्र सादर केले. त्यात त्यात मेसर्च प्लॅटिनियम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह कंपनीचा संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा, स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना गणेश कुमार, अल्पेश खारा, तौफिक रियाज, अरमान अटीयन, लल्लन सिंग यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध 27 हजार 147 पानांचे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या गुन्ह्यांत आतापर्यंत 14 हजार 157 गुंतवणुकदारांनी 142 कोटी 58 लाखांची गुंतवणुक केली असून सुमारे 35 कोटीचा मुद्देमालासह महत्त्वाचे कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.
दादर येथे टोरेस (प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड) कंपनीची एक शाखा असून या कंपनीचे मुंबईसह इतर शहरात अनेक शाखा आहे. कंपनीने सुरुवातीला मोजोनाईट नावाचा खडा खरेदी केलयावर त्यावर गुंतवणुक केल्यास दर आठवड्याला सहा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर विविध आकर्षक योजना सुरु अनेकांना या गुंतवणुक योजनेत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले. अनेकांना व्याजदराची रक्कम देऊन त्यांचा विश्वास संपादन केला होता. गुंतवणुक करणार्या गुंतवणुकदारांना इतरांनाही गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केल्यास मोठ्या रक्कमेचे कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाने कंपनीत गुंतवणुकदाराच्या परिचित व्यक्ती, नातेवाईक आणि मित्रमंडळीने कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली होती. गेल्या वर्षभरात दादर येथील शाखेत जवळपास एक लाखाहून अधिक गुंतवणुकदारांनी कंपनीच्या विविध गुंतवणुक योजनेत पैसे गुंतवणूक केली होती.
सुरुवातीला मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम दिल्यानंतर कंपनीने काही दिवसांपासून पैसे देणे बंद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच अनेक गुंतणुकदारांनी कंपनीच्या विविध शाखेत गर्दी केली होती. यावेळी कंपनीचे संचालकासह इतर पदाधिकारी पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यातून दादरच्या शाखेत अनेक गुंतवणुकदारांनी मोर्चा काढून तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर प्रदीपकुमार मामराज वैश्य या व्यक्तीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कंपनीचे संचालक सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर, महाव्यवस्थापक तानिया कॅसोतोवा आणि स्टोर इंचार्ज व्हॅलेंटीना यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच संबंधित आरोपींविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. सुरुवातीला तिघांना अटक केल्यानंतर इतर इतर चौघांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या अटकेनंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून काही कॅशसहीत महत्त्वाचे कागदपत्रे, सोने-चांदीचे दागिने, खडे असा सुमारे 35 कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आतापर्यंतच्या तपासात या कंपनीत 14 हजार 157 गुंतवणुकदारांनी 142 कोटी 58 लाखांची गुंतवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्याने संबंधित आरोपीविरुद्ध सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी 27 हजार 147 पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. या गुन्ह्यांत काही आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. काही आरोपी विदेशात पळून गेल्याने त्यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस बजाविण्यात आली आहे. या आरोपींच्या अटकेनंतर पुरवणी आरोपपत्र सादर केले जाणार आहे.