टोरेस घोटाळ्यातील वॉण्टेड सीईओ गजाआड

पुण्यात आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ जानेवारी २०२५
मुंबई, – टोरेस घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुंबईतून पळून गेलेल्या कंपनीचा सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर याला पुण्यातून आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या गुन्ह्यांत अटक झालेला तौफिक हा पाचवा आरोपी असून अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या घोटाळ्याच्या फसवणुकीचा आकड्याने शंभर कोटी पार केले आहे. शनिवारपर्यंत ८ हजार ८०० गुंतवणुकदारांनी त्यांची तक्रार नोंदविली होती. त्यामुळे हा आकडा १०१ वर पोहचल्याचे तपास अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

दादर येथे टोरेस (प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड) कंपनीने अनेकांना मोजोनाईट खड्डा खरेदी करुन त्यावर गुंतवणुक केल्यास आठवड्याला सहा टक्के व्याजदाराचे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडून कंपनीच्या विविध शाखांमध्ये अनेकांनी गुंतवणुक केली होती. सुरुवातीला मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम दिल्यानंतर कंपनीने काही दिवसांपासून पैसे देणे बंद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच गुंतणुकदारांनी कंपनीच्या विविध शाखेत गर्दी केली होती. यावेळी कंपनीचे संचालकासह इतर पदाधिकारी पळून गेल्याचे गुंतवणुकदाराच्या निदर्शनास आले होते. हा प्रकार उघडकीस येताच प्रदीपकुमार मामराज वैश्य या व्यक्तीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर, महाव्यवस्थापक तानिया कॅसोतोवा आणि स्टोर इंचार्ज व्हॅलेंटीना कुमार यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच संचालक अजय सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर याच गुन्ह्यांत हवाला ऑपरेटर अल्पेश शहा ऊर्फ खारा याला गिरगाव येथून पोलिसांनी अटक केली होती. संबंधित चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या चौघांच्या अटकेनंतर पोलिसांनी पळून गेलेल्या इतर आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम सुरु असताना कंपनीचा मुख्य आरेापी आणि सीईओ तौफिक रियाज हा पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीनंतर शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी त्याला पुण्यातून अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला सोमवार ३ फेबुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच या गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम १३ कोटी ४८ लाख रुपये इतकी होती. मात्र शनिवार २५ जानेवारीपर्यंत ८ हजार ८०० जणांनी तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीवरुन फसवणुकीचा हा आकडा आता १०१ कोटीवर पोहचला आहे.

या गुन्ह्यांत दहाजणांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून त्यातील काही आरोपी विदेशी नागरिक आहे. ते सर्वजण विदेशात पळून गेले आहे. त्यात कंपनीचे संचालक व्हिक्टोरिया कोलालेन्को, माजी संचालक ओलेना स्टोअन, प्रमोटर इम्रान जावेद, मुस्तफा काराकोक, ऑलेक्झांडर झोपिचेन्को, ओलेक्ट्राझांड्रा बुनकिव्हरस्का, ओलेक्झांड्रा ट्रेडखिब आर्टेम ऑलीफरचुक आणि इउरचेन्को झगोर यांचा समावेश आहे. फरारी आरोपींच्या अटकेसाठी आता मुंबई पोलिसांनी ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजाविणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page