टोरस घोटाळ्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान
१९१६ गुंतवणुकदारांची तक्रार; फसवणुकीचा आकडा ३९ कोटी तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत १८ जानेवारीपर्यंत वाढ
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ जानेवारी २०२५
मुंबई, – टोरस घोटाळ्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाल्याचा दावा आर्थिक गुन्हे शाखेकडून सोमवारी विशेष सेशन कोर्टात सांगण्यात आले. आतापर्यंत १९१६ गुंतवणुकदारांची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली असून फसवणुकीचा आकडा सुमारे ३९ कोटीच्या घरात पोहचला आहे. दरम्यान याच गुन्ह्यांत अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत शनिवार १८ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तानिया कसतोआ ऊर्फ तजगुल अरॅक्सनोआ खासातोवा, वेलेटिंना गणेश कुमार आणि सर्वेश अशोक सुर्वे अशी या तिघांची नावे अशी या तिघांची नावे असून तिघांनाही कडकोट पोलीस बंदोबस्तात कोर्टात हजर करण्यात आले होते.
टोरेस कंपनीतील कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आल्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकार्यांविरुद्ध ३१६ (५), ३१८ (४), ६१ भारतीय न्याय सहिता सहकलम ३, ४ महाराष्ट्र ठेवीदारच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तानिया कसतोआ, वेलेंटिना कुमार आणि सर्वेश सुर्वे या तिघांना अटक केली होती. सर्वेश हा डोंगरीतील उमरखाडी येथे राहत असून तो कंपनीत संचालक म्हणून काम करत होता. तानिया आणि वेलेटिंना हे दोघेही अनुक्रमे उझेबेकिस्तान आणि रशियाचे नागरिक असून ते दोघेही कंपनीत महाव्यवस्थापक आणि स्टोअर इंचार्ज म्हणून कामाला होते. याच गुन्ह्यांचा सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु केला आहे. या तिन्ही आरोपींच्या चौकशीतून इतर अकरा आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. या सर्व आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यात कंपनीचा सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर, संचालक व्हिक्टोरिया कोलालेन्को, माजी संचालक ओलेना स्टोअन, प्रमोटर इम्रान जावेद, मुस्तफा काराकोक, ऑलेक्झांडर झोपिचेन्को, ओलेक्ट्राझांड्रा बुनकिव्हरस्का, ओलेक्झांड्रा ट्रेडखिब आर्टेम ऑलीफरचुक आणि इउरचेन्को झगोर यांचा समावेश आहे. यातील काही आरोपी विदेशी नागरिक असल्याने त्यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस बजाविण्यात आली आहे. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात कॅशसहीत वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, टॅब, लॅपटॉप, संगणक साहित्य, हिरे, चांदीचे दागिने, डिव्हीआर, राऊटर ऑफिसचे शिक्के आदी जप्त केले असून त्यातून अनेक गोष्टींचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत पोलिसांकडे १ हजार ९१६ गुंतवणुकदारांनी तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीवरुन फसवणुकीचा आकडा तेरा कोटीहून ३९ कोटीवर पोहचला आहे. अजूनही काही गुंतवणुकदार तक्रार करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे फसणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीसह आरोपींचे विविध बँकेत चालू खाते असून ते सर्व खाती फ्रिज करण्यात आले आहे. या बँक खात्यात ३ लाख ३८ हजार ८२७ रुपये शिल्लक आहेत. यातील तानियाविरुद्ध २००८ साली सहार पोलिसांनी ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला हेता. तिच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असून हा खटला न्यायप्रविष्ठ असल्याचे तपासातउघडकस आले आहे. आरोपींच्या कंपनीने मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर या ठिकाणी शोरुम उघडले असून तिथेही अनेक गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
शिवाजी पार्कसह मिरा-भाईंदरच्या नवघर, नवी मुंबईतील राबोडी पोलीस ठाण्यात संबंधित आरेापीविरुद्ध इतर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींच्या घरासह कार्यालयत छापा टाकण्यात आला होता. त्यात तानिया आणि वेलेंटिना कुमार यांच्या अंगझडतीत १६ लाख २९ हजार ७०२ रुपये, तानियाच्या घरातून ७७ लाख १५ हजार ६०० रुपये, टोरेस कंपनीच्या वेगवेगळ्या शोरुममध्ये ५ कोटी ९८ लाख ६९ हजार ८४७ रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली. या तिघांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपत होती. त्यामुळे या तिघांनाही पोलीस बंदोबस्तात विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ही मागणी मान्य करुन तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत १८ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली. त्यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात पुन्हा पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. आरोपींच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेला आता पाच दिवस मिळणार आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा शनिवारी विशेष न्यायालयत हजर केले जाणार आहे.
तिन्ही आरोपीच्या पोलीस कोठडीसाठी पोलिसांनी मांडलेले मुद्दे.
गुन्ह्यांचा तपास हाती येताच पोलिसांनी कंपनीच्या कार्यालयासह अटक आरोपींच्या राहत्या घरी छापा टाकला होता. यावेळी तानिया आणि वेलेंटिना कुमार यांच्या अंगझडतीत १६ लाख २९ हजार ७०२ रुपये, तानियाच्या घरातून ७७ लाख १५ हजार ६०० रुपये, टोरेस कंपनीच्या वेगवेगळ्या शोरुममध्ये ५ कोटी ९८ लाख ६९ हजार ८४७ रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली. त्यांच्याकडून आणखीन रक्कम हस्तगत करणे बाकी आहे.
गुंतवणुकीसाठी आरोपींनी अनेक गुंतवणुकदारांना बोगस हिरे दिले आहेत. ते हिरे त्यांनी कधी, कोठून आणले याचा आरोपींकडून तपास करणे बाकी आहे.
वेलेंटिनासह इतर पाहिजे आरोपी विदेशी नागरिक असून त्यांच्याविषयी माहिती काढून त्यांना या गुन्ह्यांत अटक करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपींची चौकशी करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
आरोपींनी टोरेस कंपनीच्या माध्यमातून अनेक गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे. ही फसवणुक त्यांनी अशा प्रकारे केली. फसवणुकीची रक्कम त्यांनी कोठे गुंतविली आहे. काही स्थावर, जंगम मालमत्ता खरेदी केली आहे का याबाबत तपास बाकी आहे.
या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे. आरेपी कंपनीत कोणी रक्कम पुरवली याची माहिती काढणे बाकी आहे.
अटक तिन्ही आरोपी पोलीस तपासात सहकार्य करत नाही. त्यामुळे त्यांची पोलीस कोठडी मिळाली तर आणखीन तपास करण्यास मदत होईल. त्यांच्याकडून जास्तीत पुरावे गोळा करायचे बाकी आहे.
शोरुम भाडयाने, फर्निचर, हिरे खरेदी करण्यासाठी तसेच सुरुवातीचा परतावा देण्यासाठी सुमारे २५ कोटी खर्च झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. ही रक्कम आरोपींना कोणी पुरविली आहे. याबाबत तपास बाकी आहे.
फसवणुकीची रक्कम मोठ्या प्रमाणात विदेशात पाठविण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यातून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तिन्ही आरोपींची चौकशी बाकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.