मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जानेवारी २०२५
मुंबई, – टोरेस कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळा उघडकीस आल्यांनतर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी आरोपीविरुद्घ विशेष मोहीम हाती घेतली असताना शुक्रवारी या कटाशी संबंधित लॅपटॉप, हार्डडिक, सीसीटिव्ही फुटेजसह इतर महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांच्या हाती सापडले असून या पुराव्यामुळे कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकार्यांविरुद्ध भक्कम पुरावा मिळाल्याचा दावा पोलिसांकडून करणयात आला आहे. दुसरीकडे गुरुवारी सर्च ऑपरेशनमध्ये जप्त केलेल्या कॅशची मोजमाप पूर्ण झाली असून सुमारे पाच कोटीची कॅश जप्त करण्यात आली आहे. टोरेसे कंपनीविरोधात तक्रार करणार्या गुंतवणुकदारांची संख्या वाढत असून शुक्रवारीही अनेक गुंतवणुकदारांनी कंपनीविरोधात तक्रार नोंदविली होती. या तक्रारीवरुन फसणुकीचा आकडा आता २२ कोटी झाली असून आगामी काळात ही रक्कम आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
टोरेस कंपनीतील कोटयवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस येताच शिवाजी पार्क पोलिसांनी कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत आहे. या तिघांची चौकशी सुरु असताना दुसरीकडे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी सर्वेश, तानिया आणि व्हेलेंटिना यांच्या कुलाबा, डोंगरी आणि डोंबिवलीसह तीन शाखांमध्ये सर्च ऑपरेशन हाती घेतले होते. या कारवाईत पोलिसांनी कोटयवधी रुपयांची कॅश जप्त केली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कॅश मोजण्याचे काम सुरु होते. रात्री आठ वाजेपर्यंत ही कॅश पाच कोटी असल्याचे उघडकीस आले. त्यापैकी ७७ लाखांची कॅश तानिया कॅसाटोवा हिच्या कुलाबा येथून राहत्या घरातून जप्त करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलिसांनी तीन हजाराहून अमेरिकेन डायमंड जप्त केले असून ते हिरे जयपूरसह इतर शहरातून दोनशे ते तीनशे रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले होते. तेच डायमंड गुंतवणुकीच्या गुंतवणुकदारांना चाळीस ते पन्नास हजार रुपयांना देण्यात आले होते. या संपूर्ण कटात युक्रेनची एक महिला ओलेना स्टोयनच्या महिलेचा सहभाग उघडकीस आला असून ती कंपनीत संचालक म्हणून कार्यरत होती. तिच्यासह या गुन्ह्यांतील अन्य एक वॉण्टेड आरोपी व स्टोर इंचार्ज व्हॅलेंटीना कुमार हे दोघेही डिसेंबरला मुंबईहून विदेशात पळून गेले होते. ख्रिसमस साजरा करण्यासाठी घरी जातो असे सांगून ते दोघेही विदेशात पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या दोघींच्या अटकेसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे रेड कॉर्नर नोटीस बजाविणार आहे. सर्च ऑपरेशनदरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी लॅपटॉप, सीसीटिव्ही फुटेज, हार्डडिस्कसह इतर महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले आहे. या दस्तावेजामुळे अनेक गोष्टींचा उलघडा होणार असून तपासाला मदत होणार असल्याचे बोलले जाते.
या गुन्ह्यांची व्याप्ती प्रचंड मोठी असून शुक्रवारीही शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनेक गुंतवणुकदारांनी तक्रार नोंदविण्यासाठी रांगा लावल्या होत्या. पहिल्या दिवशी फसवणुकीचा आकडा १३ लाख ४८ लाख रुपये इतका होता. गुरुवारी हा आकडा १९ कोटी तर शुक्रवारी २२ कोटीपर्यंत पोहचला आहे. आणखीन तक्रारदार तक्रार नोंदविण्यासाठी येत असल्याने फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्च ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या लॅपटॉप, हार्डडिस्कसह इतर दस्तावेजाची तपासणी सुरु असून आतापर्यंत तपासात आरोपीविरुद्ध भक्कम पुरावा दावा पोलिसांकडून सांगण्यत आले. या गुन्ह्यांतील एक वॉण्टेड आरोपी तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर आणि सर्वेश सुर्वे हे दोघेही बोगस आधारकार्ड बनवून देण्याचे काम करत होते. रियाज हा विरार येथे राहत असून तो भायखळा आणि नागपाडा परिसरात बोगस आधारकार्डची विक्री करायचा. या दोघांनाही नंतर कंपनीत सीईओ आणि संचालकपदी घेण्यात आले होते.
कर्मचार्यांनी आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश केला
कोट्यधधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यासाठी कंपनीने अनेक बेरोजगार सुशिक्षित कर्मचार्यांना मोठ्या पगारावर कामावर ठेवले होते. महिन्यांच्या शेवटच्या दिवशी सर्वांना बँक खात्यात त्यांचे वेतन जमा होत होते. मात्र डिसेंबर महिन्यांत कर्मचार्याचे पगार बँकेत जमा झाले नव्हते. याबाबत दादर शाखेतील कर्मचार्यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडे त्यांच्याकडून त्यांचेही पगार झाले नसल्याचे समजले. त्यातच कंपनीने गुंतवणुकदारांना व्याजदराची रक्कम देणे बंद केल्याने अनेक गुंतवणुकदार दादर शाखेत विचारणा करण्यासाठी येत होते. यावर तोडगा काढण्यासाठी ५ जानेवारीला कंपनीच्या अधिकार्यासह इतर कर्मचार्यांची कॉन्फरन्स हॉलमध्ये एक मिटींग झाली होती. त्यात व्याजदराची रक्कम बंद झाल्यासह रखडलेल्या पगारावरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. याच वादातून काही कर्मचार्यांनी थेट गुंतवणुकदारांना आगामी काळात कंपनीकडून मोठा आर्थिक घोटाळा होण्याची शक्यता वर्तवून त्यांना दादर शाखेत पैशांसाठी एकत्र जमा होण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. काही ठराविक गुंतवणुकदारांना हा मॅसेज पाठविल्यानंतर त्यांनी इतर गुंतवणुकदारांना हाच मॅसेज फॉरवर्ड केला होता. काही वेळात हजारो गुंतवणुकदारापर्यंत हा मॅसेज पोहचला आणि ६ जानेवारी ते सर्वजण दादर शाखेत जमा झाले. या सर्व गुंतवणुकदारांनी त्यांच्या मूळ रक्कमेसह व्याजाच्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. प्रचंड घोषणाबाजी करुन तिथे गोंधळ घातला होता. अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणुकदार जमा झाल्यानंतर कंपनीचे सर्व संचालकासह पदाधिकारी पळून गेले होते. दुसरीकडे ही माहिती प्राप्त होताच शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याबाबत अनेक गुंतवणुकदारांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगून कंपनीविरद्ध कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. कंपनीच्या कर्मचार्यांनी अप्रत्यक्षपणे या संपूर्ण आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचे आता चर्चा आहे.