टोरेस कंपनीची महाव्यवस्थापक तानिया व्हाईट कॉलर गुन्हेगार
सहार पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा; डोंगरीत ६९ कॅश सापडली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जानेवारी २०२५
मुंबई, – टोरेस कंपनीतील झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील एक मुख्य आरोपी आणि कंपनीची महाव्यवस्थापक तानिया कसातोवा ही फसवणुकीच्या गुन्ह्यांतील व्हाईट कॉलर गुन्हेगार असून सोळा वर्षांपूर्वी तिला ७७ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहार पोलिसांनी अटक केली होती. तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान नाकाबंदी करताना डोंगरी पोलिसांनी जप्त केलेली सुमारे ६९ कॅश हीदेखील तानिया हिच्या मालकीची होती. याच पैशांबाबत तिची आयकर विभागाकडू चौकशी करण्यात आली होती. मात्र तिने पैशांचा हिशोब तिने आयकर विभागाला दिला नव्हता. त्यामुळे या पैशांची केवळ डायरीत नोंद करुन तपास बंद करण्यात आला होता असे बोलले जाते. दरम्यान अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपत असल्याने त्यांना दुपारी पुन्हा किल्ला कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात दादर येथील टोरेस कार्यालयातील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा शिवाजी पार्क पोलिसांनी पर्दाफाश केला होता. याच गुन्ह्यांत संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. सध्या ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांच्या चौकशीतून आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस कोठडीत असलेल्या या तिघांची पोलिसांकडून चौकशी असताना या अधिकार्यांना डोंगरीतील ६९ लाखांच्या कॅशबाबतची माहिती मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत पैशांचा वाटप होऊ नये म्हणून स्थानिक पोलिसांनी परिसरात नाकाबंदी आणि गस्त वाढविली होती. याच नाकाबंदीत डोंगरीत पोलिसांनी ६९ लाखांची कॅश जप्त करुन ती कॅश आयकर विभागाकडे सोपविली होती. तपासात ही कॅश तानिया हिची असल्याचे उघडकीस आले होते. तिची आयकर विभागाने चौकशी केल्यानंतर ती विदेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले होते. या रक्कमेबाबत तिने आयकर विभागात कुठलेही कागदपत्रे सादर केले नव्हते. त्यामुळे कॅश जप्त केल्याची आयकर विभागाने डायरीमध्ये नोंद करुन तपास सुरु केला होता.
तानिया ही गेल्या वीस वर्षांपासून भारतात वास्तव्रयास आहे. टोरेस कंपनीत ती महाव्यस्थापक म्हणून कामाला होती. या २० वर्षांत ती भारतातील अनेक शहरात गेली होती. या कालावधीत ती विदेशात गेल्याचे तिच्या पासपोर्टवरुन उघडकीस आले आहे. तिने कुठल्या देशात प्रवास केला होता, त्यामागे तिचा काय उद्देशहोता याबाबत माहिती काढली जात आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यापैकी अकराजणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींचा शोध सुरु असताना त्यापैकी काहीजण विदेशात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्या अटकेसाठी इमिग्रेशन अधिकार्यांची मदत घेतली असून त्यांच्याविरुद्ध लवकरच रेड कॉर्नर नोटीस बजाविली जाणार आहे. दुसरीकडे सर्वेश सुर्वे, तानिया कसातोवा आणि व्हेलेंटिना कुमार यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपणार आहे. त्यामुळे त्यांना सोमवारी दुपारी पुन्हा किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे. आतापर्यंत झालेला तपास, जप्त मुद्देमाल आणि इतर आरोपींची माहिती काढण्यासाठी या तिघांच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.