टोरेस आर्थिक घोटाळ्याप्रकरणी वॉण्टेड आरोपीस अटक

आरोपी युकेनियन अभिनेता; ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ जानेवारी २०२५
मुंबई, – टोरेस आर्थिक घोटाळ्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अर्मेन अटेन असे या आरोपीचे नाव असून तो युकेनियन देशाचा नागरिक तसेच अभिनेता आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने सोमवार ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांतील ही सहावी अटक आहे. त्यापैकी चार आरोपी न्यायालयीन तर एक आरोपी पोलीस कोठडीत आहेत. अर्मेनला टोरेस घोटाळ्यातील सर्व आर्थिक व्यवहाराची माहिती होती, त्यामुळे त्याच्या अटकेने अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता, अखेर त्याला मालवणीतील मढ परिसरातून पोलिसांनी अटक केली.

गेल्या महिन्यांत टोरेस घोटाळा उघडकीस आला होता. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच संचालक अजय सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. हा तपास हाती येताच या पथकाने गिरगाव येथून हवाला ऑपरेटर अल्पेश शहा ऊर्फ खारा आणि पुण्यातून सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर या दोघांना अटक केली होती. त्यापैकी तौफिक वगळता इतर चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. इतर आरोपींचा शोध सुरु असताना युक्रेनियन अभिनेता अर्मेन अटेल हा मालवणीतील मढ परिसरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर त्याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला बुधवारी किल्ला कोर्टाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अर्मेन हा युक्रेनियन नागरिक असून अभिनेता म्हणून परिचित आहे. त्याने हॉलीवूडच्या काही चित्रपटांत काम केले आहे. ही कंपनीत वाढविण्यासाठी तसेच आर्थिक व्यवहारात त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. बोगस पॅनकार्ड मिळविण्याच्या प्रयत्नात त्याची तौसिफशी ओळख झालीी होती. कंपनीच्या प्रत्येक बैठकीत त्याचा सहभाग होता. कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार सुरुवातीला त्याच्याकडे होते, मात्र नंतर त्याने कंपनीपासून स्वतला बाजूला केले होते. या संपूर्ण कटाचा त्याचा सहभाग उघडकीस आल्याने त्याच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. हा प्रकार उघडकीस येताच तो पळून गेला होता. तो अभिनेता असल्याने त्याला चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने संपर्क साधण्यात आला होता असेही तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page