टोरेस आर्थिक घोटाळ्यातील सिलबंद शॉपमध्ये चोरीचा प्रयत्न
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांकडून तपास सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 मार्च 2025
मुंबई, – कोट्यवधी रुपयांच्या टोरेस आर्थिक घोटाळा उघडकीस आल्यानंतर गावदेवी परिसरातील एक शॉप आर्थिक गुन्हे शाखेने सील केला होता, या शॉपमध्ये शुक्रवारी सकाळी चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शॉपमधून काहीही वस्तू चोरीस गेली नसली तरी सील केलेला शॉपचे शटर तोडून चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपीची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.
श्रीधर शंकरराव भोईटे हे ताडदेव येथील पोलीस वसाहतीत राहत असून सध्या आर्थिक गुन्हे शाखेत सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या युनिट चारकडे टोरेस आर्थिक घोटाळ्याचा तपास सुरु आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर या पथकाने गावदेवी येथील एन. एस पाटकर मार्ग, धरम पॅलेस इमारतीमध्ये असलेला शॉप क्रमांक तीन सिल केला होता. 7 मार्च ते 14 मार्च या कालावधीत संंबंधित शॉप उघडण्यात आले नव्हते. शुक्रवारी 14 मार्चला सकाळी दहा वाजता आर्थिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तिथे शहानिशा करण्यासाठी गेले होते. त्यात श्रीधर भोईटे यांच्यासोबत पोलीस शिपाई ललित महाजन होते. घटनास्थळी गेल्यानंतर या पोलीस पथकाला संबंधित शॉप सिलबंद असताना अज्ञात व्यक्तीने शॉपचे शटर तोडून आत प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले होते.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांचे प्रभारी पोलीस निरीक्षक रमेश यादव यांना ही माहिती दिली हाती. या माहितीनंतर पोलीस निरीक्षक संदेश मांजरेकर व अन्य पोलीस पथक तिथे रवाना झाले होते. घटनास्थळीची पाहणी केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने आत प्रवेश केल्याचे, मात्र शॉपमधून काहीही वस्तू चोरीस गेली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने सहाय्यक फौजदार श्रीधर भोईटे यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी घरफोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा गावदेवी पोलिसांकडून तपास सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.