गुंतवणुकीची रक्कम विदेशात पाठविणारा हवाला ऑपरेटर गजाआड
अटक आरोपीची संख्या चारवर; फसवणुकीचा आकडा ८३ कोटीवर
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ जानेवारी २०२५
मुंबई, – दामदुप्पट रक्कमेच्या आमिषाने अनेक गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी टोरेस घोटाळ्यात अन्य एका आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. गुंतवणुकीची रक्कम विदेशात पाठविल्याचा आरोप असलेल्या अल्पेश शहा ऊर्फ खारा असे या हवाला ऑपरेटरचे नाव असून अटकेनंतर त्याला पोलीस बंदोबस्तात विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला मंगळवारपर्यंत २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पेशच्या अटकेने टोरेस घोटाळ्यातील अटक आरोपींची संख्या आता चार झाली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत तानिया कसतोआ ऊर्फ तजगुल अरॅक्सनोआ खासातोवा, वेलेटिंना गणेश कुमार आणि सर्वेश अशोक सुर्वे या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या तिघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपणार असल्याने त्यांना शनिवारी पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान या घोटाळ्यातील तक्रारदाराची संख्या ५ हजार २८९ झाली असून फसवणुकीचा आकडा ८३ कोटी ६३ लाखांवर पोहचला आहे. याच गुन्ह्यांत आतापर्यंत २७ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
टोरेस घोटाळा उघडकीस आल्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकार्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच कंपनीचे संचालक, सीईओ आणि स्टोअर इंचार्ज तानिया कसतोआ ऊर्फ तजगुल अरॅक्सनोआ खासातोवा, वेलेटिंना गणेश कुमार आणि सर्वेश अशोक सुर्वे या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्याने त्यांची पोलिसाकडून चौकशी करण्यात आली होती.
या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आली होती. त्यात अकरा मुख्य आरोपींचा समावेश होता. मात्र या तिघांच्या अटकेनंतर ते सर्वजण पळून गेले होते. त्यात कंपनीचा सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर, संचालक व्हिक्टोरिया कोलालेन्को, माजी संचालक ओलेना स्टोअन, प्रमोटर इम्रान जावेद, मुस्तफा काराकोक, ऑलेक्झांडर झोपिचेन्को, ओलेक्ट्राझांड्रा बुनकिव्हरस्का, ओलेक्झांड्रा ट्रेडखिब आर्टेम ऑलीफरचुक आणि इउरचेन्को झगोर यांचा समावेश आहे. या आरोपींचा शोध सुरु असताना शुक्रवारी गिरगाव येथून पोलिसांनी अल्पेश शहा ऊर्फखारा या ५४ वर्षांच्या आरोपीस अटक केली. अल्पेश हा हवाला ऑपरेटर असून त्यानेच हवालामार्फत फसवणुकीची रक्कम विदेशात पाठविल्याचा आरोप आहे.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला मंगळवार २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच गुन्ह्यांत आतापर्यंत ५ हजार २८९ गुंतवणुकदारांनी तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीवरुन फसवणुकीचा आकडा ८३ कोटी ६३ लाखांवर पोहचल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत पोलिसांनी ६ कोटी ७४ लाखांची कॅश, ४ कोटी ५३ लाखांचे सोने, चांदी, खडे, बँक खात्यातील १५ कोटी ८४ लाख रुपयांची कॅश फ्रिज केली आहे.
अशा प्रकारे आतापर्यंत पोलिसांनी २७ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत तानिया, वेलेंटिना आणि सर्वेश हे तिघेही पोलीस कोठडीत आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवार १८ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे या तिघांनाही शनिवारी पुन्हा विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याचंी आणखीन तीन ते चार दिवसांची पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. या गुन्ह्यांत अल्पेशला अटक झाल्याने त्यांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी या पोलीस कोठडीची मागणी होणार असल्याचे बोलले जाते.