टोरस फसवणुक घोटाळ्याचा आकडा ८३.४३ कोटीवर पोहचला
तिन्ही आरोपीना पोलीसऐवजी चौदा दिवसांची न्यायालयनीन कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जानेवारी २०२५
मुंबई, – टोरस फसवणुक घोटाळ्याचा आकडा ८३ कोटी ४३ लाखांपर्यंत पोहचला असून शनिवारीही अनेक गुंतवणुकदार तक्रार करण्यासाठी आली होते. आगामी काळात फसवणुकीचा हाच आकडा शंभर कोटीपेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान याच गुन्ह्यांत अटकेत असलेल्या तिन्ही आरोपींना शनिवारी दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी या आरोपींना पोलीसऐवजी चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. तानिया कसतोआ ऊर्फ तजगुल अरॅक्सनोआ खासातोवा, वेलेटिंना गणेश कुमार आणि सर्वेश अशोक सुर्वे अशी या तिघांची नावे आहेत. न्यायालयीन कोठडी सुनावल्याने सर्वेशला आर्थर रोड तर तानिया आणि वेलेटिंना या दोघींना भायखळा येथील महिला कारागृहात पाठविण्यात आले आहे.
टोरेस घोटाळा उघडकीस आल्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकार्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच कंपनीचे संचालक, सीईओ आणि स्टोअर इंचार्ज तानिया कसतोआ ऊर्फ तजगुल अरॅक्सनोआ खासातोवा, वेलेटिंना गणेश कुमार आणि सर्वेश अशोक सुर्वे या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते तिघेही १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत होते. त्यांच्या पोलीस कोठडीत मुदत संपत असल्याने तिन्ही आरोपींना पुन्हा विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी चौकशीसाठी तिघांच्या पोलीस कोठडीची पोलिसांकडून मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून तिन्ही आरोपींना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.
याच गुन्ह्यांत शुक्रवारपर्यंत ५ हजार २८९ गुंतवणुकदारांनी तक्रार नोंदविली होती. या तक्रारीवरुन फसवणुकीचा आकडा ८३ कोटी ६३ लाखांवर पोहचला होता. शनिवारी १ हजार १८२ गुंतवणुकदारांनी तक्रार नोंदविली होती. त्यामुळे फसवणुकीचा आकडा आता ८८ कोटी ४३ लाखांवर पोहचल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आगामी काळात इतर काही गुंतवणुकदार तक्रार नोंदविण्यात येणार असल्याने हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.