मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जानेवारी २०२५
मुंबई, – टोरस कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आकडा आता ९४ कोटी ८१ लाखांवर पोहचला असून आतापर्यंत ७ हजार ९२३ गुंतवणुकदारांनी तक्रार नोंदविली आहे. आगामी काळात हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान याच गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असलेला हवाला ऑपरेटर अल्पेश शहा ऊर्फ खारा याच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली. त्यामुळे त्याला २४ जानेवारीला पुन्हा विशेष सेशन कोर्टात हजर केले जाणार आहे. अल्पेश शहाच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांनी कुठे कुठे फसवणुकीची रक्कम पाठविली, कुठल्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली याचा तपशील काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
टोरेस घोटाळा उघडकीस आल्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकार्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच कंपनीचे संचालक, सीईओ आणि स्टोअर इंचार्ज तानिया कसतोआ ऊर्फ तजगुल अरॅक्सनोआ खासातोवा, वेलेटिंना गणेश कुमार आणि सर्वेश अशोक सुर्वे या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. इतर आरोपींचा शोध सुरु असताना शुक्रवारी १७ जानेवारीला या गुन्ह्यांतील हवाला ऑपरेटर अल्पेश शहा याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला न्यायालयाने २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २४ जानेवारीपर्यंत वाढ केली आहे.
या गुन्ह्यांत आतापर्यंत अकरा आरोपींना वॉण्टेड दाखविण्यात आले असून त्यात आठ युक्रेन तर एका तुर्कस्थानच्या नागरिकाचा समावेश आहे. ते सर्वजण विदेशात पळून गेले आहे. त्यात कंपनीचा सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर, संचालक व्हिक्टोरिया कोलालेन्को, माजी संचालक ओलेना स्टोअन, प्रमोटर इम्रान जावेद, मुस्तफा काराकोक, ऑलेक्झांडर झोपिचेन्को, ओलेक्ट्राझांड्रा बुनकिव्हरस्का, ओलेक्झांड्रा ट्रेडखिब आर्टेम ऑलीफरचुक आणि इउरचेन्को झगोर यांचा समावेश आहे. फरारी आरोपींच्या अटकेसाठी आता मुंबई पोलिसांनी ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजाविणार आहे.