फॉरेन टूरच्या नावाने अनेकांना गंडा घालणार्‍या युपी टोळीचा पर्दाफाश

उत्तरप्रदेशासह मुंबईतून कंपनीच्या दोन संचालकांना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ मार्च २०२४
मुंबई, – फॉरेन टूरच्या नावाने कंपनीचे सभासद बनवून विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सेमीनारमध्ये लोकांचा विश्‍वास संपादन करुन फसवणुक करणार्‍या उत्तर प्रदेशातील एका टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. फसवणुकीनंतर कंपनीला टाळे लावून पळून गेलेल्या दोन वॉण्टेड संचालकांना उत्तरप्रदेशासह मुंबईतून पोलिसांनी अटक केली. हिमांशू अश्‍वनी तिवारी आणि नोमान जुबेर अहमद कैसर अशी या दोघांची नावे असून ते दोघेही उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने फॉरेन टूर पॅकेज क्लब मेंबरशीपच्या नावाने आतापर्यंत बारा ते पंधराजणांची लाखो रुपयांची फसवणुक केल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांनी सांगितले.

यात्री क्लब ऑफ हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक खाजगी कंपनी असून ही कंपनी फॉरेन टूर पॅकेज सेवा देणारी एक नामांकित कंपनी असल्याची आरोपींनी जाहिरात केली होती. कंपनीने मुंबईसह इतर ठिकाणी सेमीनारचे आयोजन करुन, आमंत्रित केलेल्या लोकांना सवलतीच दरात फॉरेन टूर पॅकेजचे आमिष दाखविले होते. त्यांना कंपनीचे सभासद होण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर फॉरेन टूरसाठी लाखो रुपये घेऊन कुठलीही सेवा न देता अनेकांची फसवणुक केल्याच्या अनेक तक्रारी पोलिसाकडे प्राप्त झाल्या होत्या. घाटकोपर आणि साकिनाका येथे दोन तक्रारदारांना अशाच प्रकारे फॉरेन टूरचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अनुक्रमे सहा लाख सत्तर हजार व पाच लाख अकरा हजार रुपये घेण्यात आले होते. मात्र फॉरेन टूरचे आयोजन न करता कंपनीला टाळे लावून संचालकासह सर्व कर्मचारी पळून गेले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी साकिनाका आणि घाटकोपर पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीच्या संचालकासह इतर आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता.

या गुन्ह्यांची पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त चेतन काकडे, प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर मुजावर, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत शिरसाट, गणेश गोरेगावंकर, पोलीस हवालदार विनोद परब, रविंद्र देवार्डे, वैभव गिरकर, युवराज देशमुख, विकास चव्हाण, राहुल पाटील यांनी तपास सुरु केला होता.

तपासात आरोपींनी विविध ठिकाणी यात्री क्लब ऑफ हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड नावाचे तीन कार्यालय सुरु करुन स्वतचे संपर्क क्रमांक दिले होते. त्यामुळे या क्रमांकासह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असताना यातील मुख्य आरोपी हिमांशू तिवारी हा उत्तरप्रदेशात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथून हिमांशूला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून नोमान कैसरचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याला अंधेरी येथून पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान ते दोघेही कंपनीचे संचालक म्हणून काम करत होते. त्यांनीच सोशल मिडीयावर बोगस जाहिरात देऊन अनेकांना स्वस्तात फॉरेन टूरचे आमिष दाखविले होते. कंपनीचे सभासद झाल्यास टूरमध्ये मोठी सवलत मिळेल असे सांगून अनेकांना टूरसाठी पैसे गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. या टोळीने आतापर्यंत बारा ते पंधराजणांकडून फॉरेन टूरसाठी लाखो रुपये घेऊन या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. त्यांच्या चौकशीतून ही माहिती उघड होताच त्यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती.

अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून आणखीन काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान या कंपनीसह आरोपींकडून फसवणुक झालेल्या लोकांनी गुन्हे शाखा युनिट तीनशी संपर्क साधावा असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page