टूर पॅकेजच्या नावाने वयोवृद्ध जोडप्याची फसवणुक

टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्सच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ एप्रिल २०२४
मुंबई, – न्यूझीलंडच्या टूर पॅकेजच्या नावाने दहिसर येथील एका वयोवृद्ध जोडप्याची टुर्स मालकाने फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तेजस महेंद्र शाह याच्याविरुद्ध दहिसर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. तेजस हा दहिसरच्या पूर्वा हॉलिडेज टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्सचा मालक असून त्याने टूर पॅकेजच्या नावाने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

६५ वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार गिता निखील पारीख ही बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळील विंटर ग्रीन अपार्टमेंटमध्ये तिचे पती निखील, मुलगा भाविक, सून कृतिका यांच्यासोबत राहते. ती स्टेट बँकेत कामाला होती तर तिच्या पतीचा स्वतचा व्यवसाय होता. ते दोघेही सध्या निवृत्त झाले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत गिताने तिचे पतीसोबत विदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता. याच दरम्यान तिला एका गुजराती दैनिकात पूर्वा हॉलिडेज टुर्स आणि ट्रॅव्हेल्सची न्यूझीलंड टूरची जाहिरात दिसली होती. त्यामुळे तिने जाहिरातीत दिलेल्या दहिसर येथील टुर्स कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली होती. यावेळी तिने तिच्या पतीसोबत न्यूझीलंड टूरचे पॅकेज बुक करुन तेजस शाह याला ८ लाख ३३ हजार रुपये दिले होते. टूर पॅकेज बुक होताच तिला जीएसटीसह संपूर्ण पेमेंट केल्याचे बिल देण्यात आले होते. त्यानंतर तिने व्हिसासाठी अर्ज केला होता. १४ नोव्हेंबर २०२३ रोजी या दोघांचा व्हिसा मंजूर झाल्याचे पूर्वा हॉलिडेजकडून सांगण्यात आले. व्हिसानंतर त्यांनी तिकिट बुकींगचे आश्‍वासन दिले होते, मात्र तेजस शाहने त्यांचे तिकिट बुक केले नाही. याबाबत वारंवार विचारणा करुनही त्याने तिकिटविषयी काहीच माहिती दिली नाही.

काही दिवसांनी तेजसने १ जानेवारी २०२४ पर्यंत तिकिट बुक झाले नाहीतर त्यांचे संपूर्ण पेमेंट परत करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिकिट बुक केले नाही. त्यामुळे गिता पारीखने तेजस शाहकडे टूर पॅकेजसाठी दिलेल्या ८ लाख ३३ हजाराची मागणी केली होती. ६ जानेवारीला त्याने तिला आठ लाख तीन हजार रुपयांचा एक चेक दिला होता. मात्र हा चेक दोन वेळा बँकेत डिपॉझिट करुनही बाऊन्स झाला होता. त्यामुळे तेजसने तिला दिड लाख रुपये परत केले होते. मात्र उर्वरित ६ लाख ८३ हजाराचा अपहार करुन त्याने तिची फसवणुक केली होती. या घटनेनंतर गिता पारीखने तेजसविरुद्ध दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. लवकरच तेजसची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page