नजीकचे भाडे नाकाराल तर आता रिक्षाचालकाची खैर नाही
मुजोर रिक्षाचालकाविरुद्ध वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम ५२ हजार १८९ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मार्च २०२४
मुंबई, – लांबपल्ल्याच्या भाड्यासाठी नजीकचे भाडे नाकाराल, गणवेश न घालणे तसेच वेगवेगळे कारण सांगून ग्राहकांशी वाद घालणे आता रिक्षाचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाहतूक पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून अशा मुजोर रिक्षाचालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईतर्ंगत पंधरा दिवसांत ५२ हजार १८९ रिक्षाचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नजीकचे भाडे नाकारणे, गणवेश परिधान न करणे, बॅच आणि इतर कागदपत्रे न बाळगणे या कलमांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांत काही मुजोर रिक्षाचालकाविरुद्ध विविध तक्रारी ग्राहकांकडून वाहतूक पोलिसांना प्राप्त झाले होते. विविध रेल्वे स्थानके, मॉल, बस स्थानकासह इतर ठिकाणी रिक्षाचालक लांबपल्ल्याचे भाडे मिळविण्यासाठी बर्याच वेळा नजीकचे भाडे नाकारतात. ग्राहकांशी वाद घालून वाहतूक पोलिसांनी दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन करतात. अनेक रिक्षाचालक त्यांच्या गणवेश घालत नाही. त्यामुळे बॅच नसते. जादा प्रवाशी घेऊन ग्राहकांची लुट करतात अशा तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीची वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत सर्वच वाहतूक पोलीस चौकींना अशा रिक्षाचालकाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर आले होते. ८ एप्रिल ते २२ एप्रिलदरम्यान वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेतर्गत पोलिसांनी ५२ हजार १८९ रिक्षाचालकाविरुद्ध कारवाई केली आहे. त्यात ३२ हजार ६५८ रिक्षाचालकाविरुद्ध भाडे नाकारणे, ५ हजार २६८ रिक्षचालकाविरुद्ध विना गणवेश, ८ हजार ६५० रिक्षाचालकाविरुद्ध जादा प्रवासी वाहतूक करणे तसेच इतर कलमांतर्गत ५ हजार ६१३ रिक्षचालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांविुद्ध ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वसामान्यांकडून कौतुक केले जात आहे. अशा कारवाईमुळे मुजोर रिक्षाचालकावर चांगलाच चाप बसणार आहे. त्यामुळे ही कारवाई यापुढेही अशीच सुरु ठेवावी अशी विनंती सर्वमसान्यांकडून होत आहे.