फ्लॅशिंग दिवे लावणार्या वाहनांसह चालकावर दंडात्मक कारवाई
दोन दिवसांत ऐंशी फ्लॅशिंग लाईटसह तीन सायरन जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2026
मुंबई, – फ्लॅशिंग दिवे आणि सायरन लावून वाहतूक पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन करणार्या वाहन चालकाविरुद्ध आता मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेतंर्गत गेल्या दोन दिवसांत वाहतूक पोलिसांनी ऐंशी वाहनांवरील फ्लॅशिंग दिवे आणि तीन सायरन जप्त करुन संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई केली आहे. चालू वर्षांतील ही आतापर्यंत सर्वांत मोठी कारवाई सुरु असून आगामी काळात ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी बोलताना सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई शहरात काही खाजगी वाहनाचालक तसेच अनधिकृत व्यक्ती त्यांच्या वाहनांच्या टपावर बेकायदेशीपणे लाल, निळे किंवा पिवळे फ्लॅशिंग दिवे लावून फिरत असल्याच्या अनेक तक्रारी वाहतूक पोलिसांना प्राप्त झाले होते. अशा प्रकारच्या दिव्यांचा वापर करुन संबंधित वाहनचालक व्हीआयपी असल्याचा बनाव करत होते, वाहतूक कोंडीतून बेकायदेशीरपणे मार्ग काढणे, सामान्य नागरिकासह कर्तव्यावर असलेल्या पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण करत होते. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अशा वाहनचालकाविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश सर्वच वाहतूक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले होते.
या आदेशानंतर मरिनड्राईव्ह आणि वांद्रे वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे 1 एप्रिल आणि 2 एप्रिल असे दोन दिवस विशेष मोहीम हाती घेतली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, मुबारक शेख यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद सुळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश मुळीक, किशोर जगदाळे, निशिकांत मोरे, पोलीस हवालदार किरण फड, अनिल शिंदे, पोलीस शिपाई सतीश सानप, प्रतिक सावंत, सुनिल वनवे, बाळू ढाकणे, वैभव कांबळे, देवराम आव्हाड, अरुण शिंदे यांनी वेगवेगगळ्या कारवाईत ऐंशी वाहनांवरील फ्लॅशिंग दिवे आणि तीन सायरन आदी जप्त केले आहेत. संबंधित वाहनचालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई केली होती.
ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार आहे. यापुढे कोणत्याही खाजगी आणि अनधिकृत वाहनांवर असे डोम लाईट्स किंवा सायरन आढळल्यास, त्या वाहनचालकासह मालकावर मोटार वाहन कायद्यांतर्गत जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई होणार आहे. तसेच गंभीर प्रकरणात वाहनांची नोंदणी रद्द करण्याची शिफारस आरटीओकडे केली जाणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी त्यांच्या वाहनांवर फ्लॅशिंग दिवे किंवा सायरन लावू नये असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. शहरात अशा प्रकारे बेकायदेशीर दिवे ावून फिरणारी वाहने दिसल्यास त्याची माहिती वाहतूक पोलिसांना द्यावी असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितले.