लाचप्रकरणी मनपाच्या दोन कर्मचार्यांसह तिघांना कारावास
पाच वर्षांच्या सक्तमजुरीसह पन्नास हजाराच्या दंडाची शिक्षा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मार्च 2025
मुंबई, – अपात्र उमेदवारांना पात्र करुन एसआरएच्या सदनिकांचे मूळ वितरणपत्र देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाचप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या मनपाच्या दोन कर्मचार्यासह तिघांना विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरवून कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यात मनपाच्या एफ विभागाचे दुय्यम अभियंता नितीन जाधव, श्रमिक अशोक रोकडे आणि खाजगी व्यक्ती सज्जाद जब्बार खान यांचा समावेश असून या तिघांनाही पाच वर्षांच्या सक्तमजुरीसह पन्नास हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सात वर्षांपूर्वी या तिघांनाही लाचेची रक्कम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.
यातील तक्रारदारांना त्यांच्या परिचित आणि ओळखीच्या लोकांच्या झोपड्या पात्र करुन नवीन योजनेतील सदनिकाचे मूळ वितरणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात तक्रारदारांनी दुय्यम अभियंता नितीन जाधव आणि श्रमिक अशोक रोकडे यांची भेट घेतली असता त्यांनी त्यांच्याकडे पन्नास हजाराची लाचेची मागणी केली होती. लाचेची ही रक्कम त्यांनी खाजगी व्यक्ती सज्जाद खान यांना देण्यास सांगितले होते. त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी संबंधित दोन्ही कर्मचार्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांनी लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर मुंबई युनिटच्या संबंधित अधिकार्यांनी एफ वॉर्डमध्ये सापळा लावला होता. यावेळी नितीन जाधव आणि अशोक रोकडे यांच्या वतीने 50 हजार रुपयांची लाच घेताना सज्जाद खान याला या अधिकार्यांनी रंगेहाथ अटक केली. या गुन्ह्यांत या दोघांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपीविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्याची नियमित विशेष कोर्टात सुरु होती,
अलीकडेच या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आणि कोर्टाने तिन्ही आरोपींना दोषी ठरविले होते. गुरुवारी 27 मार्चला या खटल्याचा निकाल देताना कोर्टाने तिन्ही आरोपींना पाच वर्षांच्या कारावास आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्यांचा तपास अधिकारी पोलीस निरीक्षक आर. टी ठेंगले, सहाय्यक पोलीस आयुक्त वैभव पाटील, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, शैलेंद्र चव्हाण यांनी केला तर सरकारी वकिल म्हणून प्रभाकर तरंगे यांनी कोर्टाचे कामकाज पाहिले होते.