फसवणुकीच्या गुन्ह्यांत पुण्यातील ट्रॅव्हेल्स व्यावसायिकाला अटक
व्हिसाच्या पैशांचा अपहार करुन डॉक्टरसह दोघांची फसवणुक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 जानेवारी 2026
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांत पुण्यातील एका ट्रॅव्हेल्स व्यावसायिकाला एमआयसीडी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. संदीपकुमार शिवकुमार जैस्वाल असे या 45 वर्षीय व्यावसायिकाचे नाव असून तो पुण्यातील हिजवाडी, वाकडचा रहिवाशी आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्यावर एका डॉक्टरसह त्यांच्या मित्रांच्या व्हिसाच्या कामासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रवास चंद्र साहू हे 49 वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते अंधेरीतील मरोळ परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांची स्वतची एक खाजगी कंपनी असून त्यांच्यासह त्यांची पत्नी कंपनीत संचालक म्हणून काम पाहतात. त्यांचे चंदर प्रेम सिंग हे परिरचित डॉक्टर असून त्यांच्यसासोबत त्यांचे गेल्या सहा वर्षांपासून कौटुंबिक संबंध होते. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत व्हिएतनामला फिरायला जाणार होते, त्यामुळे त्यांनी त्यांना त्यांच्यासोबत येण्यास सांगितले होते. श्री साई ट्रॅव्हेल्स कंपनीने ही ट्रिप आयोजित केल्याचे सांगून त्यांनी त्यांना कंपनीचे मालक संदीपकुमार जैस्वाल यांचा मोबाईल क्रमांक दिला होता. त्यामुळे त्यांनी संदीपकुमारला फोन करुन ट्रिपची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्याने त्यांना त्यांच्या डॉक्टर मित्रांसोबत त्यांच्या कुटु्रंबियांची बुकींग करुन देत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नीचा पासपोर्ट संदीपकुमारकडे पाठवून दिला होता. ठरल्याप्रमाणे संदीपकुमारला त्यांनी त्यांच्यासह डॉक्टर मित्रासाठी व्हिसासाठी सुमारे सव्वाआठ लाखांचे पेमेंट केले होते. नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी संदीपला कॉल केला होता, यावेळी त्याने अद्याप व्हिसा मिळाला नसून लवकरच व्हिसा मिळेल असे सांगितले. प्रत्येक वेळेस तो व्हिसाबाबत विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी इतर ट्रॅव्हेल्स कंपनीकडे व्हिसाबाबत चौकशी केली होती. यावेळी त्यांनी त्यांना वीस दिवसांत व्हिसा मिळत असल्याचे सांगितले.
याबाबत त्यांनी संदीपकुमारकडे विचारणा करुन व्हिसासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होतीजै. मात्र त्याने त्यांना पैसे परत केले नाही. संदीपकुमारने व्हिसासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार एमआयडीसी पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संदीप जैस्वालविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर या पथकाने संदीपकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.