तिहेरी हत्येप्रकरणी अल्पवयीन मुलासह आरोपीस अटक

आरोपीला कोठडी तर मुलाची बालसुधारगृहात रवानगी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 मे 2025
मुंबई, – बोरिवलीतील तिहेरी हत्येप्रकरणी एका आरोपीस एमएचबी पोलिसांनी अटक केली. अमर रामनवल गुप्ता असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत अन्य एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

बोरिवलीतील गणपत पाटील नगरात राहणार्‍या गुप्ता आणि शेख कुटुंबियांमध्ये जुना वाद सुरु होता. याच वादातून रविवारी सायंकाळी या दोन्ही गटातील तुफान राडा झाला होता. दोन्ही गटाकडून एकमेकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. लाथ्याबुक्यासह तिक्ष्ण हत्याराने केलेल्या हल्ल्यात दोन्ही कुटुंबातील सातजण गंभीररीत्या जखमी झाले होते. जखमी झालेल्या या सर्वांना नंतर जवळच्या लोटस आणि शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे रामनवल गुप्ता, अरविंद रामनवल गुप्ता आणि हमीद नसीरुद्दीन शेख या तिघांना मृत घोषित करण्यात आले तर अमर रामनवल गुप्ता, अमीत रामनवल गुप्ता, अरमान हमीद शेख आणि हसन हमीद शेख यांच्यावर उपचार सुरु होते. त्यापैकी अमरला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले होते.

याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येसह हत्येचा प्रयत्न, दंगल घडविल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. याच गुन्ह्यांत अमर गुप्तासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच गुन्ह्यांत अमरला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला सोमवारी रात्री डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. याच गुन्ह्यांत इतर आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे. या आरोपींमध्ये तिन्ही जखमींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page