व्हॉटअपवर पत्नीला तिहेरी तलाक देणार्‍या पतीविरुद्ध गुन्हा

मालवणीतील घटना; सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ जून २०२४
मुंबई, – दुसर्‍या तरुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून सहा महिन्यांपूर्वी विवाह केलेल्या पत्नीला व्हॉटअपवर तिहेरी तलाक देणार्‍या पतीविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अफनान कय्युम पटेल असे या आरोपी पतीचे नाव असून प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी त्याने पत्नीशी वाद घालून आधी व्हॉटअपवर आणि नंतर तिला समोर तिहेरी तलाक बोलून घटस्फोट घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

२१ वर्षांची तक्रारदार महिला तिचे पती अफनान, सासरे कय्युम, सासू फरीदा यांच्यासोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहते. तिचे पती मालाडच्या इनॉरबीट मॉलमध्ये कामाला आहे तर सासरे वायरमनचे काम करतात. २७ डिसेंबर २०२३ रोजी तिचे अफनानसोबत दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने लग्न झाले होते. एक आठवडा सर्व सुरळीत सुरु होते. मात्र एक आठवड्यानंतर तिचा पती उशिरापर्यंत मोबाईलवर कोणाशी तरी चॅट करत असल्याचे तिच्या लक्षात आले. मोबाईलची पाहणी केल्यानंतर त्याचे एका तरुणीसोबत चॅट सुरु असल्याचे तिला समजले होते. या दोघांमध्ये प्रेमसंंबध होते. याबाबत तिने अफनानला विचारणा केली असता त्याने तिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध आहे, तुला जे करायचे ते कर असे सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न केला. याच कारणावरुन त्यांच्यात नंतर खटके उडू लागले होते. तो सतत तिला घटस्फोट देण्याची धमकी देत होता. लग्नाला काही दिवस झाल्याने तिने हा प्रकार तिच्या माहेरी सांगितला नव्हता. १६ मेला अफनानसोबत चॅट करताना त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि त्याने तिला व्हॉटअपवर तिहेरी तलाक देत तिच्यासोबत राहायचे नाही असा मॅसेज पाठविला होता. त्याकडे तिने दुर्लक्ष केले होते.

३० मेला पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि त्याने पुन्हा तिला तिहेरी तलाक देत घरातून निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यांनी अफनानला समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो घटस्फोटावर ठाम असल्याचे लक्षात येताच ते तिला घेऊन जोगेश्‍वरीतील घरी घेऊन आले. या घटनेनंतर तिने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. विवाहीत असताना दुसर्‍या तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेवून पत्नीला व्हॉटअपवर तिहेरी तलाक दिल्याचा तिने आरोप केला होता. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी अफनानविरुद्ध भादवीसह मुस्लिम महिला कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page