तक्रार मागे घेत नाही म्हणून पत्नीवर पतीकडून हल्ला

पतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल तर पतीला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 जुलै 2025
मुंबई, – कौटुंबिक हिंसाचाराची केलेली तक्रार मागे घेत नाही म्हणून एका 37 वर्षांच्या महिलेवर तिच्याच पतीने पाईपसह लोखंडी सळईने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ट्रॉम्बे परिसरात घडली. याप्रकरणी आरोपी पतीसह सासूविरुद्ध ट्रॉम्बे पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपी पतीला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

स्वाती ही महिला ट्रॉम्बेच्या कोळीवाडा, हरिचंद्र हाऊस परिसरात राहते. अजय हा तिचा पती तर लक्ष्मी तिची सासू आहे. तिचा पती रिक्षाचालक आहे तर ती बीएआरसीमध्ये घरकाम करते. 2009 साली तिचे अजयसोबत विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसांपासून तो तिचा क्षुल्लक कारणावरुन मानसिक व शारीरिक शोषण करत होता. तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. सततच्या छळाला कंटाळून तिने 1 जून 2025 रोजी तिच्या पतीविरुद्घ ट्रॉम्बे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर ती तिच्या तिन्ही मुलांसोबत तिच्या वाशीनाका येथील माहेरी निघून आली होती. यावेळी अजयने तिची माफी मागून तिला पुन्हा घरी नेले होते.

घरी आल्यानंतर तो तिला तिने केलेली तक्रार मागे घेण्यासाठी तगादा लावला होता. मात्र तिने तिची तक्रार मागे घेतली नाही. यावेळी तिने सहा महिने चांगले राहिले तर तक्रार मागे घेण्याचे त्याला आश्वासन दिले होते. त्याचा त्याच्या मनात राग होता. त्यामुळे त्याने तिच्याकडे पाच लाखांची मागणी केली होती. ही रक्कम तिने तिच्या वडिलांकडून आणून द्यावी यासाठी तो तिच्याशी वाद घालत होता. मात्र तिने पैसे आणण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. त्यावरुन तो तिचा पुन्हा घरगुती कारणावरुन मानसिक व शारीरिक शोषण करु लागला होता. त्याला तिच्या सासू लक्ष्मीची साथ होती. तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. त्यामुळे ती घाबरुन घरातून पळनू गेली.

घडलेला प्रकार तिने तिच्या वडिलांसह बहिणीला सांगितला. याच दरम्यान तिथे अजय आला आणि त्याने तिला पाईपने बेदम मारहाण केली. हा प्रकार गस्त घालणार्‍या ट्रॉम्बे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. गस्त घालणारे पोलीस निघून गेल्यानंतर त्याने पुन्हा लोखंडी सळईने तिला बेदम मारहाण केली. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. आज तुझा जीव घेतो अशी धमकी देत त्याने तिला मारहाण सुरुच ठेवली होती. रक्तबंबाळ झालेली स्वाती तिथे कोसळली होती.

ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या स्वातीला पोलिसांनी तातडीने गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पती अजय आणि सासू लक्ष्मी या दोघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page