मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ एप्रिल २०२४
मुंबई, – क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून हमजा हानिफ शेख या ३० वर्षांच्या तरुणाची त्याच्याच परिचित तरुणाने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना ट्रॉम्बे परिसरात घडली. याप्रकरणी मोहम्मद नूर शेख ऊर्फ पैदा या आरोपी तरुणाविरुद्ध ट्रॉम्बे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर मोहम्मद नूर पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना रविवारी १६ जूनला दुपारी दिड वाजता ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प, लाल मैदानासमोरील शहाजीनगर शाळेजवळ घडली. हजेफा हनीफ शेख हा याच पसिरातील बी सेक्टरमध्ये राहत असून डिलीव्हरी बॉयचे काम करतो. मृत हमजा हा त्याचा लहान भाऊ असून तो सेल्समन म्हणून कामाला होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून तो बेरोजगार होता. रविवारी दुपारी साडेबारा वाजता हमजा हा नास्ता करुन घराबाहेर गेला होता. काही वेळानंतर त्याला त्याचे मित्र आरिफ मिर्झा, मोहम्मद नासीर खान आणि मोहम्मद जाहिद भेटले. ते सर्वजण शहाजीनगर शाळेजवळ गप्पा मारत होते. याच दरम्यान तिथे मोहम्मद नूर आला आणि त्याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी हमजा आणि मोहम्मद नूर यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे हमजाच्या तिन्ही मित्रांनी त्याची समजूत काढून त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र मोहम्मद नूर हा प्रचंड आक्रमक झाला होता. काही कळण्यापूर्वीच त्याने त्याच्या खिशातून चाकू काढून हमजाच्या छातीत भोसकले. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. या हल्ल्यानंतर मोहम्मद नूर तेथून पळून गेला. रक्तबंबाळ झालेल्या हमजाला त्याच्या मित्रांनी तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हजेफा शेख याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी मोहम्मद नूर याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. क्षुल्लक वादातून मोहम्मद नूरने हमजाची हत्या केल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.