मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ एप्रिल २०२४
मुंबई, – भांडणात मध्यस्थी केली म्हणून लहान भावाने मोठ्या भावावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी ट्रॉम्बे परिसरात घडली. या हल्ल्यात अरबाज रेहमतअली खान हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी लहान भाऊ सेहबाज रेहमत अली खान याच्याविरुद्ध ट्रॉम्बे पोलिासांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा ट्रॉम्बे येथील शब्बीर फाऊंनडेशन रुग्णालयाजवळ घडली.
अरबाज खान हा २५ वर्षांचा तरुण ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प, डी सेक्टरमध्ये राहतो. त्याचे वडिल भरतकाम करतात तर तो इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतो. त्याचा सेहबाज हा लहान भाऊ असून तो काहीच काम करत नाही. शुक्रवारी १२ एप्रिलला रात्री सव्वादोन वाजता सेहबाजचे एका लहान मुलाशी भांडण झाले होते. ही माहिती समजताच अरबाज तिथे गेला होात. त्याने त्यांच्यातील भांडण सोडविण्याचा प्रयत्न करुन सेहबाजला घरी येण्यास सांगितले. मात्र तो त्याच्यासोबत घरी येण्यास तयार नव्हता. यावेळी त्याने रागाच्या भरात मला सोडून दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. तरीही अरबाजला त्याला घेऊन घराच्या दिशेने जात होता. रागाच्या भरात त्याने अरबाजवर चाकूने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. हा प्रकार तिथे उपस्थित लोकांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी झालेल्या अरबाजला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला नंतर शीव रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अरबाजची पोलिसांनी जबानी नोंदवून त्याचा लहान भाऊ सेहबाज खानविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर सेहबाज पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. लहान भावाने मोठ्या भावावर चाकूने हल्ला केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.