मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – ट्रॉम्बे जेट्टीजवळील खाडीच्या पाण्यात सहा महिन्यांच्या स्त्री जातीच्या मृत अर्भकाची विल्हेवाट लावून अज्ञात व्यक्तीने पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी सायंकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु केला आहे. गेल्या काही दिवसांतील ही दुसरी घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मानखुर्द येथील पीएमजीपी कॉलनीत संजय भोपाल माने हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कामाला असून सध्या त्यांची नियुक्ती ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता ट्रॉम्बे जेट्टी परिसरात एका नवजात अर्भकाला अज्ञात व्यक्तीने टाकून पलायन केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एक नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडले होते. या अर्भकाला तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी संबंधित अर्भकाला मृत घोषित केले होते. या अर्भकाचा जन्म लपविण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने अर्भकाला खाडीच्या पाण्यामध्ये टाकून मृत अर्भकाची गुप्तपणे विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपीची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. या आरोपीला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.