काम मिळत नसल्याच्या नैराश्यातून अभिनेत्याची आत्महत्या
तुषार घाडीगावकर राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 जून 2025
मुंबई, – गेले वर्षभर बरेच प्रयत्न करुनही काम मिळत नसल्याने नैराश्यातून मराठी अभिनेत्याने आत्महत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. तुषार घाडीगावकर असे या अभिनेत्याचे नाव असून त्याने अनेक मराठी मालिकासह चित्रपटात काम केले होते. घरात कोणीही नसताना शुक्रवारी रात्री त्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले होते. त्याच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे तुषारच्या आत्महत्येचा खुलासा होऊ शकला नाही. त्याच्या वडिलांसह पत्नीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्यांनी कोणावर संशय व्यक्त केला किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नव्हती. मानसिक नैराश्यातूनच तुषारने आत्महत्या केल्याचे जबानीत नमूद केले आहे. त्यामुळे गोरेगाव पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. दरम्यान तुषारच्या आत्महत्येने मराठी सिनेसृष्टीत प्रचंड शोककळा पसरली होती.
तुषार हा सिंधुदुर्गच्या कणकणलीचा रहिवाशी असून मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून परिचित होता. रुपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेताना त्याने अभिनयाची सुरुवात केली होती. त्याने लवंगी मिरची, मन कस्तुरी रे आणि सुखाच्या सरींना हे मन बावरे या मराठी मालिकांमध्ये तर भाऊबळी, उनाड, झोबिवली आदी चित्रपटात काम केले होते. तसेच संगीत बिबट आख्यान या नाटकातील त्याची भूमिका अनेकांना पसंद पडली होती. अलीकडेच सन मराठीच्या सखा माझा पांडुरंगा या मालिकेत त्याने काम केले होते. तुषार हा त्याच्या कुटुंबासोबत गोरेगाव येथील राम मंदिर रोड, एसआरए सोसायटीच्या 102 मध्ये राहत होता.
शुक्रवारी रात्री उशिरा त्याने त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. तो कोणाचेही फोन घेत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी शेजार्यांना घरी जाऊन चौकशी करण्याची विनंती केली होती. मात्र त्याने शेजार्यांनाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. यावेळी त्यांना तुषारने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी तुषारला पोलिसांनी जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे तुषारच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
तुषार हा काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्याला काम मिळत नव्हते. त्यातून त्याला प्रचंड नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन स्वतचे जीवन संपविल्याचे बोलले जाते. तुषारला दारुचे व्यसन होते. काम मिळत नसल्याने गेल्या एक वर्षांपासून तो प्रचंड तणावात होता. या घटनेनंतर त्याच्या वडिलांसह पत्नीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या आत्महत्येबाबत त्यांनी कोणालाही जबाबदार धरले नाही किंवा संशय व्यक्त केला नाही. त्यांच्या जबानीनंतर गोरेगाव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. ंदरम्यान तुषारच्या आत्महत्येचे वृत्त समजताच मराठी सिनेकलाकरांना प्रचंड मासिक धक्का बसला होता.